सर्वोपचार रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांचा भार वाढला; महिनाभरात औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 10:55 AM2021-08-10T10:55:23+5:302021-08-10T10:55:32+5:30
Akola GMC : महिनाभर पुरेल एवढाच औषध साठा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
- प्रवीण खेते
अकोला : आठवडाभरापासून जिल्ह्यात व्हायरल तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. डेंग्यू, मलेरियासदृश रुग्णांची संख्या जास्त असून, बहुतांश रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी गर्दी करत आहेत. सर्वोपचार रुग्णालयातील नॉनकोविड ओपीडीवर रुग्णांचा भार वाढत असताना महिनाभर पुरेल एवढाच औषध साठा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांपैकी काही औषधे रुग्णांना खासगी औषधांच्या दुकानांतून खरेदी करावी लागत आहेत.
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील कोविडची स्थिती नियंत्रणात आहे, मात्र व्हायरलच्या तापाचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासदृश तापाची लक्षणे असल्याने अकोल्यासह ग्रामीण भागातील अनेक रुग्ण सर्वोपचार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात गर्दी करत आहेत. तापासह रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, थकवा आदी लक्षणेही दिसून येत आहेत. रुग्णांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना डॉक्टरांकडून औषधे लिहून दिली जातात, मात्र त्यातील बहुतांश औषधे खासगी औषध दुकानांतून आणण्याचा सल्ला येथील कर्मचाऱ्यांकडून दिला जात आहे. सर्वोपचार रुग्णालयात औषधे नसल्याने रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
हाफकिनकडे मागणी करूनही पुरवठा नाही
राज्य शासनाच्या हाफकिन संस्थेमार्फत शासकीय रुग्णालयांना औषध पुरवठा केला जातो. त्यानुसार एप्रिल, मे महिन्यांतच सर्वोपचार रुग्णालयामार्फत हाफकिनकडे औषधांची मागणी करण्यात आली होती. सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी होऊनही हाफकिनमार्फत औषधांचा पुरवठा झाला नाही. अशातच नॉनकोविड रुग्णांची संख्या वाढल्याने औषधांची मागणी वाढली आहे. त्यामुळे महिनाभर पुरेल एवढाच औषधसाठा सर्वोपचार रुग्णालयात शिल्लक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
काही औषधं एक्सपायरीच्या उंबरठ्यावर
वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी हाफकिनकडून औषधांचा पुरवठा झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोविडचा शिरकाव झाला. त्यामुळे नॉनकोविड रुग्णांची संख्या कमी झाली होती. अशा परिस्थितीत या औषधांचा वापरच झाला नाही. त्यामुळे यातील काही प्रकारची औषधे एक्सपायर झाली आहेत, तर काही औषधे एक्सपायरीच्या उंबरठ्यावर आहेत. ही स्थिती अकोल्यासह राज्यातील उर्वरित शासकीय रुग्णालयांमध्येही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ताप आल्याने मी सर्वोपचार रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर औषधे लिहून दिली; मात्र त्यातील बहुतांश औषधे सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे १२० रुपये खर्च करून खासगी औषध दुकानातून औषधे घ्यावी लागली.
- दीपक पाटील, रुग्ण डाबकी रोड, अकोला