अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 02:35 PM2019-07-02T14:35:55+5:302019-07-02T14:36:02+5:30
भाजपने शहरी भागातील निदान अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघावर पाणी सोडावे, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे.
- आशिष गावंडे
अकोला: मागील पंचवीस वर्षांपासून अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात भक्कमपणे पाय रोवणाऱ्या भारतीय जनता पार्टीला लढत देण्यासाठी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाह्या वर खोचल्याचे चित्र आहे, तर जागा वाटपादरम्यान भाजपने शहरी भागातील निदान अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघावर पाणी सोडावे, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे. तर हा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
येत्या आॅक्टोबर महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षातील इच्छुकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले आहेत. १९९५ मध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातून आमदार गोवर्धन शर्मा यांनी विजयाची दमदार ‘एन्ट्री’मारली ती आजतागायत कायम आहे. आ. शर्मा सातत्याने विजयी होत असल्यामुळे या मतदार संघावर भाजपचा निर्विवाद वरचष्मा असल्याचे दिसून येते. या मतदार संघात मजबूत तटबंदी असलेल्या भाजपला किमान एकदा तरी धोबीपछाड देण्याची इच्छा मनी बाळगून असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक तयारीला लागले आहेत. या धामधुमीतही पक्षाकडून विजयी होण्यापेक्षा एकमेकांची जिरवण्यात धन्यता मानणाऱ्यांनीही तिकीटासाठी पक्षाकडे रेटा लावून धरल्याचे चित्र समोर येत आहे. दुसरीकडे जागा वाटपादरम्यान हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला यावा, अशी सेनेतील इच्छुकांची अपेक्षा आहे.
मतदार संघ न सोडण्याची काँग्रेसची तयारी
२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने विजयराव देशमुख यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. त्यावेळी राज्यातही काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी न झाल्यामुळे काँग्रेसने या मतदार संघातून उषा विरक यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राकाँच्या विजयराव देशमुख यांना २६ हजार ९८१ तसेच काँग्रेसच्या उषा विरक यांना जेमतेम १० हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदाही हा मतदार संघ राष्ट्रवादीकडेच राहावा,असा स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे. तर हा मतदार संघ राष्ट्रवादीला न देता काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा पक्षातील नेत्यांचा रेटा आहे.