‘स्थायी’च्या सभापती पदासाठी भाजपमध्ये ‘लॉबिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:47 PM2019-02-25T12:47:33+5:302019-02-25T12:47:55+5:30
अकोला: महापालिकेतील स्थायी समितीच्या सदस्यपदी दहा सदस्यांची निवड झाली. आता सभापती पदावर विराजमान होण्यासाठी भाजपमध्ये ‘लॉबिंग’ केल्या जात असल्याची माहिती आहे.
अकोला: महापालिकेतील स्थायी समितीच्या सदस्यपदी दहा सदस्यांची निवड झाली. आता सभापती पदावर विराजमान होण्यासाठी भाजपमध्ये ‘लॉबिंग’ केल्या जात असल्याची माहिती आहे. या समितीच्या माध्यमातून विकास कामांवर आर्थिक तरतूद केली जात असल्याने सभापती पदावर पक्षातील जबाबदार व अनुभवी सदस्याची निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिकेतील स्थायी समितीच्या माध्यमातून शहरातील विकास कामांसाठी आर्थिक नियोजन केले जाते. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापती पदाला मानाचे स्थान आहे. मनपाच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधील आठ सदस्यांना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांना २२ फेब्रुवारीच्या सभेत निवृत्त करण्यात आले. त्यावेळी शिवसेनेच्या मंजूषा शेळके व काँग्रेसचे इरफान खान यांनी राजीनामा दिल्यामुळे एकूण १० सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये भाजपमधून पाच, शिवसेना-२, काँग्रेस-२ व राष्ट्रवादीप्रणित लोकशाही आघाडीतून एका सदस्याची निवड करण्यात आली. सभापती विशाल इंगळे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सभापतीपद रिक्त झाले आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे संख्याबळ १० असल्याने सभापती पदाची अविरोध निवड होणार, हे निश्चित आहे. यासाठी भाजपमधील काही इच्छुकांनी पक्षाकडे ‘लॉबिंग’ सुरू केल्याची माहिती आहे.
भाजप ‘दे धक्का’च्या तयारीत!
महापालिकेत भारतीय जनता पार्टीचे ४८ नगरसेवक आहेत. शिवणी-मलकापूर प्रभागातील नगरसेवक विशाल इंगळे यांना स्थायी समितीच्या सभापदी पदावर विराजमान करून भाजपने मनपात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविला होता. त्यापूर्वी बाळ टाले यांना संधी देण्यात आली होती. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सभापती पदासाठी भाजपकडून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला जाण्याची शक्यता आहे. अशावेळी महिला सदस्याचे नाव समोर येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
‘स्थायी’मध्ये यांचा आहे समावेश
भाजप- राहुल देशमुख, विनोद मापारी, अनिल गरड, हरीश काळे, दीपाली जगताप, अर्चना मसने, शारदा खेडकर, नंदा पाटील, माधुरी मेश्राम व अनिता चौधरी.
शिवसेना- मंगेश काळे, गजानन चव्हाण.
काँग्रेस- फिरोज खान, जैनबबी शेख इब्राहिम.
लोकशाही आघाडी - अॅड. धनश्री देव, फैयाज खान.