युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदासाठी ‘लॉबिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:20 AM2017-10-17T02:20:52+5:302017-10-17T02:39:51+5:30
अकोला : मागील काही दिवसांपासून रिक्त असलेल्या युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर सक्षम व सर्वमान्य कार्यकर्त्याची निवड केली जाणार आहे. जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक असणार्या दावेदारांनी आपापल्या परीने ‘लॉबिंग’ सुरू केली असून, दिवाळीनंतर या पदाच्या दावेदाराची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.
आशिष गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मागील काही दिवसांपासून रिक्त असलेल्या युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर सक्षम व सर्वमान्य कार्यकर्त्याची निवड केली जाणार आहे. जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक असणार्या दावेदारांनी आपापल्या परीने ‘लॉबिंग’ सुरू केली असून, दिवाळीनंतर या पदाच्या दावेदाराची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
शिवसेनेने आगामी जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. कधीकाळी विदर्भात शिवसेनेचा बोलबाला होता. २0१४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वांचे पानिपत केले. त्याचा फटका सेनेला बसला. भाजपाने विदर्भ काबीज केल्याचे लक्षात आल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. त्यामुळे की काय, मागील सहा महिन्यांत त्यांनी तीन वेळा पश्चिम विदर्भात येऊन शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसते. जिल्ह्यात शिवसेनेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर २0१६ मध्ये शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. यादरम्यान युवासेनेचे जिल्हाप्रमुख पदही रिक्त झाले.
पक्षाने जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे नितीन देशमुख यांच्याकडे सोपवल्यानंतर युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर कोणाची वर्णी लागते, याची अनेकांना उत्कंठा होती. दिवाळीनंतर या पदावर जनाधार असलेल्या दावेदाराची निवड केली जाणार असल्यामुळे इच्छुकांनी पक्षाकडे ‘लॉबिंग’ सुरू केली आहे. इच्छुकांमध्ये राहुल कराळे, योगेश बुंदेले, सुरेंद्र वीसपुते, नितीन मिश्रा, विठ्ठल सरप, राहुल कराळे (अकोट) यांची नावे चर्चेत आहेत.
पदांचे केंद्रीकरण कशासाठी?
पक्षाने वाडेगाव-सस्तीमधील नितीन देशमुख यांची जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती केली. आता युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदासाठीसुद्धा याच गावातील विठ्ठल सरप यांचे नाव चर्चेत आहे. वाडेगाव सर्कलमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढणारे विठ्ठल सरप चौथ्या क्रमांकावर होते. शिवसेनेच्या पाठोपाठ युवासेनेसाठी एकाच भागातील कार्यकर्त्यांवर पक्ष मेहेरबान का, पदांचे केंद्रीकरण कशासाठी, असा सवाल सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.
कार्यकर्ते म्हणतात, सर्वसामान्यच हवा!
अंगात कडक इस्त्रीचे कपडे, डोळ्य़ांवर चढवलेला महागडा गॉगल आणि लक्झरीयस वाहनातून हात दाखवणार्या पदाधिकार्याच्या जवळ जाऊन बोलताना अवघडल्यासारखं होतं. त्यामुळे आपला माणूस वाटावा, अशा सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड करावी, असा सूर युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.
-