भुसावळ मंडळात धावणार लोकल!
By admin | Published: September 30, 2015 11:44 PM2015-09-30T23:44:12+5:302015-09-30T23:44:12+5:30
मध्य रेल्वे प्रशासनासमोर प्रस्ताव; लोकलसाठी भुसावळ-नाशिकदरम्यान केली जातेय चाचणी.
राम देशपांडे/ अकोला : मुंबईच्या धर्तीवर भुसावळ मंडळातदेखील लोकल ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी भुसावळ ते नाशिक (नांदगाव) दरम्यान काही चाचण्या घेतल्या जात असून, भुसावळ मंडळाच्या अधिकार्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मध्य रेल्वे मार्गावर भुसावळ मार्गे धावणार्या सर्वच एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांना पूर्वीच्या तुलनेत गर्दी वाढली आहे; मात्र प्रवाशांना पुरेशा सुविधा नसल्याने रेल्वेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ झाली नाही. या आणि इतर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, मुंबई उपनगरीय रेल्वेप्रमाणे लोकल ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव गत काही वर्षांपासून मध्य रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन होता. त्याला रेल्वे प्रशासनाने हिरवी झेंडी दाखवविली असून, या प्रस्तावानुसार भुसावळ ते नाशिक, भुसावळ ते अकोला आणि भुसावळ ते इटारसी या तीन प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यंत क्षणात वेग धरणार्या लोकल धावतील. मुंबईच्या धर्तीवर भुसावळ मंडळातही अनेक पायाभूत सुविधांचा अभाव असून, त्यांच्या पूर्ततेकरिता आवश्यक निधी व उपाययोजनांकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. हे काम अधिक वेगाने व्हावे, याकरिता भुसावळ ते नांदगाव-नाशिकदरम्यान अनेक चाचण्या घेण्यात येत असल्याची माहिती भुसावळ मंडळाच्या सुत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी भुसावळ ते नागपूरदरम्यान विशेष मार्ग तयार करण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. वर्धा ते नागपूरदरम्यान हा मार्ग पूर्ण झाला असला तर, उर्वरित मार्गाचे काम अद्याप थंड बस्त्यात आहे. त्यामुळे आहे त्याच मध्य रेल्वे मार्गावर लोकल चालविता येतील की नाही, लोकलची गती किती ठेवावी लागेल, त्याकरिता लागणारी सिग्नल व्यवस्था, थांबे, तसेच इतर एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होता कामा नये, यासाठी स्थानकांवर या एक्स्प्रेस गाड्यांचा थांबण्याचा सुनियोजित कालावधी आदी बाबींवर मध्य रेल्वेची विशेष चमू अभ्यास करीत आहे. या अभ्यासातून येणारे निष्कर्ष आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यासंदर्भात सध्या कोणताही कार्यक्रम हाती नसला तरी, भुसावळ मंडळातील रेल्वे प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याचा आनंद लवकरच उपभोगता येणार असल्याचे संकेत सध्याच्या हालचालींवरून मिळत आहेत. भुसावळ मंडळात लोकल सुरू करण्यासाठी नांदगाव- नाशिकदरम्यान विविध चाचण्या घेण्यात येत असून, या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर लोकल चालविण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अकोला-इटारसी आणि भुसावळ-अकोलादरम्यान लोकल चालविण्यात येईल. यासाठी लागणार्या आवश्यक मनुष्यबळाची भरती करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असल्याचे भुसावळ येथील वरिष्ठ मंडळ अधिकारी विजय नायर यांनी सांगीतले.