दारूची अवैधरीत्या विक्री करणारा एक वर्षासाठी स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:19 AM2021-05-06T04:19:14+5:302021-05-06T04:19:14+5:30
पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांची कारवाई अकोला : तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दहिगाव येथे गावठी हातभट्टीच्या दारूची अवैधरीत्या ...
पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांची कारवाई
अकोला : तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दहिगाव येथे गावठी हातभट्टीच्या दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या तसेच पोलिसांच्या कारवाईला न जुमानणाऱ्या एका इसमास पोलीस अधीक्षक जी श्रीधर व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशाने एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. नंदकिशोर ऊर्फ नंदू उकर्डा सोळके असे आरोपीचे नाव आहे.
दहिगाव येथील रहिवासी नंदकिशोर ऊर्फ नंदू उकर्डा सोळके हा गावात गावठी हातभट्टीच्या दारूची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून त्याच्यावर यापूर्वी वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच अवैधरीत्या दारू विक्री बंद करण्याच्या सूचना केल्या; मात्र, पोलिसांच्या कारवाईला न जुमानणाऱ्या नंदू सोळके याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, तेल्हारा ठाणेदार नितीन देशमुख यांनी या आरोपीविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्याकडे सादर केला. जी श्रीधर यांच्यामार्फत हा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सादर करून त्यांनी कायदेशीर बाबींची पडताळणी केली असता सदर इसम हा दारूची बेकायदेशीररीत्या विक्री करीत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर नंदू सोळके याच्याविरुद्ध स्थानबद्ध कारवाईच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंजुरी दिली. यावरून नंदकिशोर ऊर्फ नंदू उकर्डा सोळके यास तातडीने अटक करून जिल्हा मध्यवर्ती कारागृह ४ मे रोजी एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश महाले, गणेश कायंदे, विजय राजनकर यांनी केली. अकोला जिल्ह्यात शांतता राहण्यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी कारवाईचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारी बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे वास्तव आहे.