Lockdown in Akola : शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी मिळेल इंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 10:04 AM2021-05-11T10:04:55+5:302021-05-11T10:07:20+5:30
Lockdown in Akola: मालाची वाहतूक करण्याकरिता शहानिशा करून ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना इंधन पुरवठा करता येईल.
अकोला : जिल्ह्यातील कोविड संसर्ग प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवार, दि. 9 च्या रात्री 12 वाजेपासून ते शनिवार दि. 15 च्या रात्री 12 वाजेपर्यंत कडक निर्बंध जारी केले आहेत. तथापि, अत्यावश्यक सेवांचा भाग म्हणून काही बाबींना त्यातून मर्यादित मुभा देण्याचे साेमवारी जारी केलेल्या आदेशानुसार जाहीर केले आहे.
1) पेट्रोल पंप - ग्रामीण, तसेच शहरी भागातील पेट्रोल पंपांवरून सकाळी आठ ते सकाळी 11 या कालावधीत केवळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे, तसेच मालाची वाहतूक करण्याकरिता शहानिशा करून ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना इंधन पुरवठा करता येईल.
2) सर्व बँका या रुग्णालये, गॅस वितरण सेवा, ऑक्सिजन, औषधी, वैद्यकीय सेवा, मागणीनुसार पुरवठा व्हावा, याकरिता संबंधित कंपनीच्या नावाने व्यवहार करण्याकरिता 12 ते 15 च्या सकाळी 11 ते दुपारी एक यादरम्यान वेळ देण्यात येत आहे.
3) दूरसंचार, टेलिकॉम सेवा (मोबाइल रिचार्ज सेंटर वगळता), विद्युत, पारेषण इत्यादी सेवा सुरळीतपणे सुरू राहाव्यात याकरिता सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये कामे करता येतील. संबंधित आस्थापनांनी त्यांना वितरित केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
4) धान्य वितरणप्रणाली सुरळीत सुरू राहण्यासाठी सार्वजनिक वितरणप्रणालीअंतर्गतची वाहतूक अनुज्ञेय राहील.
5) वृत्तपत्र वितरण संदर्भाने वाहतुकीला परवानगी राहील. त्यांना वितरित केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
6) आस्थापना/कार्यालये– कोषागार कार्यालय, म.रा.वि.वि.कं., विद्युत पारेषण, पाणीपुरवठा व स्वच्छता, विद्युतपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, धरण व्यवस्थापन पाटबंधारे, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, कृषी विभाग, पशुसंवर्धन, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, तसेच अत्यावश्यक कामकाजाकरिता व कोविडच्या अनुषंगाने कामकाज करण्यासाठी आवश्यक असणारे विभाग, कार्यालये ही सुरू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.