Lockdown : मजूर म्हणतात, ‘आम्हाला गावी परत जायचं आहे!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 02:41 PM2020-05-05T14:41:04+5:302020-05-05T14:41:23+5:30
अकोल्यात अडकलेल्या मध्य प्रदेशातील मजुरांनी घरी जाण्याची आस सोमवारी बोलून दाखविली.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राहण्याची व भोजनाची व्यवस्था प्रशासनामार्फत चांगल्या प्रकारे करण्यात आली आहे; मात्र ‘आम्हाला गावी परत जायचं आहे’, अशा शब्दात ‘लॉकडाउन’मध्ये अकोल्यात अडकलेल्या मध्य प्रदेशातील मजुरांनी घरी जाण्याची आस सोमवारी बोलून दाखविली.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आला असून , गत २४ मार्चपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. ‘लॉकडाउन’मध्ये देशातील विविध १८ राज्यांमधील ८५७ मजूर अकोला तालुक्यात अडकले. त्यामध्ये हैदराबादहून मध्य प्रदेशकडे जाताना ६० मजुरांना दीड महिन्यापूर्वी अकोल्यात अडविण्यात आले होते. जिल्हा प्रशासनामार्फत अकोल्यातील खडकी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहूद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या सभागृहात या मजुरांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात आली असली तरी आम्हाला घरातील कुटुंबीयांची आठवण येत असून, आम्हाला आता गावी परत जायचं आहे. त्यामुळे आम्हाला गावी परत पाठविण्याची व्यवस्था प्रशासनाने तातडीने करावी, अशी आस ‘लॉकडाउन’मध्ये अडकलेल्या या आश्रित मजुरांनी बोलून दाखविली.
‘आता जेवण करावंसं वाटत नाही’!
दीड महिना होत आहे. लॉकडाउनमध्ये आम्ही येथे अडकून पडलो. राहण्याची, जेवणाची चांगली व्यवस्था असली तरी, घरी आई-वडील, वृद्ध आजोबा आहेत. कुटुंबीयांची आठवण येत असल्याने आता जेवणही करावसं वाटत नाही, अशी व्यथा मुरैना जिल्ह्यातील ज्वरा येथील रहिवासी मजूर दयालू गुजर यांनी बोलून दाखविली.
आवश्यक वस्तूंचीही मदत!
‘लॉकडाउन’मध्ये अकोल्यातील आश्रित या मजुरांच्या राहण्याची, भोजनाची व नाश्त्याची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. तसेच सॅनिटायझर, साबण, हॅण्डवॉश, दंतमंजन, बिस्कीट, कापड आदी प्रकारच्या आवश्यक वस्तूंची मदत उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे, पोलीस निरीक्षक किरण वानखडे व पराग गवई मित्र मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.
‘लॉकडाउन’नंतर पोटासाठी बाहेर पडावे लागणार!
‘लॉकडाउन’ संपल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी काम करण्याकरिता आणखी बाहेर पडावे लागणार आहे. कामासाठी दुसºया राज्यात जावे लागणार आहे, असे मध्य प्रदेशातील या आश्रित मजुरांनी सांगितले.
‘लॉकडाउन’मध्ये अकोला तालुक्यात आश्रित असलेल्या मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधित राज्य शासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्या राज्यातील मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात येईल.
- विजय लोखंडे, तहसीलदार, अकोला.
अकोला तालुक्यात राज्यनिहाय असे आहेत आश्रित मजूर!
आंध्र प्रदेश १००, आसाम ०२, बिहार २७, छत्तीसगड १३, गुजरात ०६, झारखंड २३, कर्नाटक ०२, केरळ ०९, मध्य प्रदेश ३६२, ओरिसा ३७, पंजाब ०६, राजस्थान २४, तामिळनाडू १६, तेलंगणा १२०, उत्तराखंड ०७, पश्चिम बंगाल ६१