लॉकडाउन : साठ परप्रांतीय मनपाच्या निवाऱ्यात आश्रयाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 11:01 AM2020-04-18T11:01:27+5:302020-04-18T11:01:36+5:30
निवारा केंद्रांमध्ये परराज्यातील नागरिकांचा मुक्काम वाढला असून, त्यांना घरी जाण्याची ओढ लागली असल्याची भावना मध्य प्रदेशातील व्यक्तीने बोलून दाखविली.
- आशिष गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाउन’ घोषित केला होता. आता हा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. यामुळे मनपाने उघडलेल्या दोन निवारा केंद्रांमध्ये परराज्यातील नागरिकांचा मुक्काम वाढला असून, त्यांना घरी जाण्याची ओढ लागली असल्याची भावना मध्य प्रदेशातील व्यक्तीने बोलून दाखविली.
कोरोना विषाणूचा संसर्ग देशभरात पसरत असल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ मार्च रोजी देशात १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने हातावर पोट असणाºया मजूर वर्गाने आपापल्या गावी परत जाण्याची भूमिका घेतली. प्रवासाकरिता वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अशा मजूर वर्गाने चक्क पायी चालत त्यांची गावे गाठण्याचा निर्णय घेतला; परंतु कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता अशा नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने तसेच महापालिका, नगरपालिका, नगर परिषद यांनी त्यांच्या स्तरावर निवारा केंद्र उघडण्याचे निर्देश शासनाने दिले. त्या पृष्ठभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरात दोन ठिकाणी निवारा केंदे्र उघडली आहेत.
यामध्ये अकोट फैलस्थित मनपा शाळा क्रमांक ६ च्या आवारात व रामदासपेठमधील मनपा शाळा क्रमांक ७ मध्ये निवारा केंद्र उघडण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी उघडण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये २८० पेक्षा जास्त नागरिक मुक्कामी आहेत. या नागरिकांच्या जेवणाची, झोपण्याची तसेच आरोग्य तपासणीची सुविधा मनपा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.
दर चार दिवसांआड आरोग्य तपासणी
महापालिकेच्या निवारा केंद्रात मुक्कामी असणाºया महिला, पुरुष व लहान मुलांच्या आरोग्याची दर चार दिवसांनी आरोग्य तपासणी केली जाते. आंघोळीसाठी टॉवेल, साबण आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याने काही व्यक्तींनी हा मुक्काम वाढावा, अशी भावना व्यक्त केली.
मनपाकडून सुरक्षारक्षक तैनात
महापालिकेने निवारा केंद्राच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास त्याची माहिती प्रशासनाला तातडीने व्हावी, याकरिता सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे.
इथे सुविधा आहेत; पण घरी जाण्याची चिंता आहे!
महापालिकेने जिल्हा न्यायालयासमोरील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक सातमध्ये शहरातील बेघर तसेच बाहेरगावच्या नागरिकांसाठी निवारा केंद्र उघडले. या ठिकाणी १९८ नागरिक मुक्कामी आहेत. यापैकी सात व्यक्ती परराज्यातील असून, निवारा केंद्रामध्ये सर्व सुविधा असल्या तरी घरी जाण्याची चिंता सतावत असल्याची भावना मध्य प्रदेशातील हातमजुरी करणाºया तीन कुटुंबीयांनी बोलताना व्यक्त केली.