Lockdown : अकोला जिल्हयात १ जूनपर्यंत कडक निर्बंध वाढविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 10:31 AM2021-05-16T10:31:39+5:302021-05-16T10:31:53+5:30
Lokdown in Akola : जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत राहणार सुरु; अनावश्यक घराबाहेर फिरण्यास मनाई
अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, ‘ब्रेक द चेन ’ अंतर्गत जिल्हयात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवार, १५ मे रोजी दिला. त्यानुसार १५मे रोजी रात्री १२ वाजतापासून १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत या कडक निर्बंधांच्या कालावधीत जिल्हयातील जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहणार असून, या कालावधीनंतर अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस घराबाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. कडक निर्बंधांच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ही दुकाने राहणार सुरु !
किराणा, औषधे, स्वस्त धान्य दुकानांसह इतर सर्व प्रकारची जीवनाश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने, कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने आणि कृषी प्रक्रिया उद्योगगृहे, पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळी हंगाम सामग्रीची दुकाने, पेट्रोल पंप, डिझेल व सीएनजी गॅस पंप.
बॅंका दुपारी १ वाजेपर्यंत राहणार सुरु !
जिल्हयातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंका खासगी बॅंका, वित्तीय संस्था सहकारी संस्था, पतसंस्था, विमा, पोस्ट पेमेंट बॅंक व आर्थिक बाबींशी संबंधित सर्व वित्तीय संस्था सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सुरु राहणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी रात्री ८ वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू !
कडक निर्बंधांच्या कालावधीत शासकीय मालवाहतूक, ॲम्ब्युलन्स इत्यादी अत्यावश्यक वाहनांसोबतच शेतातील कामे व मालाची वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकरिता सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत.
भोजनालय, उपहारगृहांना
‘होम डिलेव्हरी’ची परवानगी !
कडक निर्बंधांच्या कालावधीत जिल्ह्यात रेस्टाॅरंट, भोजनालये व उपहारगृहांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत केवळ ‘होम डिलेव्हरी‘व्दारे सेवा देण्यास परवानगी राहणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्या
२२ मेपर्यंत बंदच!
कडक निर्बंधांच्या कालावधीत जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या २२ मे पर्यंत बंद राहणार आहेत.
वकिलांची कार्यालये राहणार सुरु!
कडक निर्बंधांच्या कालावधीत जिल्हयातील वकीलांची कार्यालये तसेच चार्टंर्ड अकाऊंटंटची कार्यालये सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
‘माॅर्निग, इव्हीिनिंग वाॅक’;
उद्याने बंद !
कडक निर्बंधांच्या कालावधीत सार्वजनिक व खासगी क्रीडांगणे, उद्याने पूर्णत: बंद राहणार असून, सार्वजिनक ठिकाणी ‘माॅर्निंग व इव्हीनिंग वाॅक ’ करण्यास बंदी राहणार आहे.
सलून, ब्युटी पार्लर, शाळा बंद!
कडक निर्बंधांच्या कालावधीत सर्व केश कर्तनालये, सलून, स्पा, ब्युटीपार्लर, संपूर्णत: बंद राहणार आहेत. तसेच शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शिकवणी वर्ग बंद राहणार असून, ऑनलाईन पध्दतीने शिक्षणास प्रतिबंध राहणार नाही.