‘लॉकडाऊन’ तीन दिवसांचे...खरेदी महिनाभराची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:20 AM2020-07-18T10:20:37+5:302020-07-18T10:20:44+5:30
एवढ्या मोठ्या गर्दीतून घरी किराणा नेला की कोरोना, ही शंकाच उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्याच्या बाजारपेठेतील कोणत्याही गल्लीत केवळ गर्दीचेच चित्र होते. भाजी बाजार, किराणा बाजारासह इतर साहित्य खरेदीसाठी अकोलेकरांनी केलेली झुंबड पाहता अॅनलॉकनंतरचा सर्वाधिक गर्दीचा शुक्रवार हा दिवस ठरला. शुक्रवार संध्याकाळपासूनच तीन दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाल्याने पुढील तीन दिवस काहीही मिळणार नाही, त्यामुळे अकोलेकरांनी केलेली खरेदी जणू पुढील तीन महिन्यात काही मिळणार नाही, अशीच होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दी कमी होण्याच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा उद्देशच शुक्रवारच्या गर्दीने मोडीत काढला असून, एवढ्या मोठ्या गर्दीतून घरी किराणा नेला की कोरोना, ही शंकाच उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ हजाराच्यावर झाली असून, मृत्यूची संख्या शंभर झाली आहे. दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी १८ ते २० जुलैदरम्यानच्या तीन दिवसात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा, आस्थापना, बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवसात काहीही मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर अकोलेकरांनी संध्याकाळी बाजारात मोठी गर्दी केली. अकोल्यासोबतच आता ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरले आहेत. या पृष्ठभूमिवर जिल्ह्यात तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे; मात्र लॉकडाऊनचे काही खरे नाही, आधी २१ दिवस लॉकडाऊन म्हणत तीन महिने सगळे बंद ठेवले होते. आता पुन्हा असे होणार नाही, याची शाश्वती नाही. त्यापेक्षा आजच खरेदी करून ठेवलेले बरे, या विचारातून अकोलेकरांनी भाजी बाजार, किराणा दुकान, पिठाची गिरणी, मोबाइलच्या दुकानावर चांगलीच गर्दी केली.
पेट्रोल पंप अन् दारूच्या दुकानांवरही गर्दी
लॉकडाऊनच्या तिन दिवसात शहरातील पेट्रोल पंपही बंद ठेवण्यात येणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी ५ पेट्रोलपंप सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिन दिवस कोणालाही बाहेर निघता येणार नाही. तरीही पेट्रोलपंपावर गर्दी होती. दुसरीकडे दारुच्या दुकानांवरही मद्य प्रेमींनी गर्दी केली होती.