कामगारांना लॉकडाऊनची; उद्योजकांना कामगार गावी जाण्याची धास्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:17 AM2021-04-14T04:17:06+5:302021-04-14T04:17:06+5:30
गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यावर त्यातील बहुतांश कामगार मिळेल त्या मार्गाने घरी परतले होते. अनेक कामगारांना पायी घर गाठावे ...
गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यावर त्यातील बहुतांश कामगार मिळेल त्या मार्गाने घरी परतले होते. अनेक कामगारांना पायी घर गाठावे लागले; मात्र गावाकडे रोजगाराची मोठी संधी नाही, असे लक्षात आल्यावर डिसेंबर अखेर अकोल्यात पुन्हा दाखल झाले. कामगारांना परत आणण्यासाठी ठेकेदार, कंपनी मालकांनी यंत्रणा राबवली होती. आता परत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आधीपेक्षा रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लावले आहेत. शहरातील हॉटेल व्यवसाय, बांधकाम क्षेत्र अडचणीत आले आहे. मागील वर्षीचे नुकसान भरून न निघाल्याने औद्योगिक वसाहतीतील सर्वच व्यवसाय ५०-६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. अशात पुन्हा मोठ्या लॉकडाऊनची शक्यता आहे, तसे झाल्यास ठेकेदार, मालक पुन्हा आपल्याला वाऱ्यावर सोडतील, अशी भीती कामगारांना वाटू लागली आहे. त्यामुळे कामगार गावाकडे परत जात आहेत.
--बॉक्स--
गेल्या वर्षीची आठवण...
गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये येथे अडकून पडल्याने कामगारांचे प्रचंड हाल झाले. अनेकांना एकवेळच्या जेवणावर दिवस काढावे लागले.
मुला-बाळांसह पायी गावाकडे जाण्याची वेळ हजारो कामगारांवर आली होती. वेळेवर वाहन उपलब्ध होऊ न शकल्याने मोठा त्रास सहन करावा लागला.
काम बंद आणि खिशात पैसे नसल्याने कामगारांवर मोठे संकट कोसळले होते. कामगारांना मिळेल त्या वाहनाने गावाकडे परतावे लागले होते.
--बॉक्स--
कामगार कुठे किती?
८,०००
औद्योगिक वसाहत
१,५००
हॉटेल व्यवसाय
२५,०००
बांधकाम क्षेत्र
--बॉक्स--
हाताला काम नाही, इथे तरी काय करणार?
--कोट--
कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय संकटात आला आहे. त्यामुळे कामही कमी झाले आहे. पुढे लॉकडाऊन लागल्यास संपूर्ण काम बंद होईल. मग इथे तरी काय करणार, असा प्रश्न आहे.
रितेश बंसल, कामगार.
--कोट--
काही दिवसांपासून कमी प्रमाणात सुरू असलेला बांधकाम व्यवसाय शासनाच्या निर्बंधामुळे ठप्प आहे. आणखी किती दिवस हाताला काम राहील, सांगता येत नाही. त्यामुळे आता घराकडे गेलेले बरे.
विनेश गवळी, कामगार.
--कोट--
औद्योगिक वसाहतीतील उद्योग सद्यस्थितीत सुरू आहे; मात्र ते कमी प्रमाणात आहे. लॉकडाऊनची धास्ती असल्याने काम राहील की नाही, माहिती नाही. त्यामुळे अनेक सहकारी गावाला परतत आहेत.
राजेंद्र यादव, कामगार.
--बॉक्स--
कामगार गावी परतला तर...
--कोट--
लॉकडाऊन लागल्यास औद्योगिक क्षेत्रातील उद्योग सुरू राहणार आहेत. या उद्योगांमध्ये परराज्यातील कामगार कमी आहेत. कामगारांची तेवढी काळजी घेणार असून, कामगार गेल्यास काही उद्योगांना अडचण निर्माण होईल.
उन्मेश मालू, अध्यक्ष, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन.
--कोट--
कोरोनामुळे आधीच हॉटेल व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये राजस्थान व पश्चिम बंगाल येथील कामगार जाण्याच्या तयारीत आहेत. हे कामगार गेल्यास हॉटेल व्यवसायाचे न भरून निघणारे नुकसान होईल.
योगेश अग्रवाल, अध्यक्ष, हॉटेल ॲण्ड कॅटरींग असोसिएशन.
--कोट--
शहरातील मोठ्या बांधकामांमध्ये परप्रांतीय कामगार आहेत. लॉकडाऊनमुळे हे कामगार परत गेल्यास या बांधकामांवर मोठा परिणाम होईल. शहरात असे जवळपास २५ टक्के बांधकाम सुरू आहेत.
दिनेश ढगे, अध्यक्ष, क्रेडाई.