चूक महावितरणची; भूर्दंड ग्राहकांना!
By admin | Published: June 24, 2016 11:40 PM2016-06-24T23:40:15+5:302016-06-24T23:40:15+5:30
अकोला परिमंडळातील प्रकार; विलंबाने देयके देऊनही शुल्काची वसुली.
वाशिम: महावितरणकडून ग्राहकाने वापरलेल्या विजेबद्दल नियमानुसार देयके देण्यात येतात. वेळेच्या आत देयक अदा केले नाही, तर त्यांच्याकडून दंडस्वरूपात १0 रुपये अतिरिक्त रक्कम वसूल केली जाते. तथापि, अकोला परिमंडळात मागील काही महिन्यांपासून ग्राहकांना मुदत निघून गेल्यानंतर देयके देण्यात येत असून, त्यांच्याकडून दंडाची वसुलीदेखील केली जात आहे. महावितरणकडून विजेच्या वापराबद्दल वसुलीसाठी ग्राहकांना देण्यात येणार्या देयकांबाबत काही नियम आहेत. त्यानुसार कृषी व घरगुती ग्राहकांसाठी देयके अदा करण्याच्या किमान २१ दिवसांपूर्वी त्यांच्याकडे ती पोहोचायला हवीत. अर्थात कृषी आणि घरगुती ग्राहकांना वीज देयक भरणा करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देणे बंधनकारक आहे. ग्राहकांनी त्यांना आलेले देयक निर्धारित मुदतीच्या सात दिवसांपूर्वी अदा केले, तर त्यांना १0 रुपये सूट देण्यात येते; परंतु निर्धारित मुदतीच्या एकही दिवस उशिरा देयक अदा केले, तर त्यांच्याकडून १0 रुपये दंड म्हणून वसूल केले जातात. आता या नियमानुसार ग्राहकांना (कृषी व घरगुती) किमान २१ दिवसांपूर्वी वीज देयक देणे आवश्यक आहे. महावितरणकडून निर्धारित मुदतीत देयके देण्यात आली नाही, तर किमान त्यांनी ग्राहकांकडून दंड तरी वसूल करू नये, अशी अपेक्षा ग्राहकांची आहे. अकोला परिमंडळात मागील काही महिन्यांपासून वेगळाच प्रकार पाहायला मिळत आहे. ग्राहकांना निर्धारित वेळेत वीज देयके पोहचविण्यात येत नाहीच, उलट मुदत निघून गेल्यानंतर ग्राहकांपर्यंत पोहचविलेल्या देयकांबद्दल विलंब शुल्क म्हणून त्यांच्याकडूनच दंड म्हणून १0 रुपये वसूल केले जात आहेत. अकोला परिमंडळातील कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यांसह इतर काही ठिकाणी हा प्रकार पाहायला मिळाला आहे. महावितरणच्या अधिकार्यांकडे याबाबत तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नाही.