Lok Sabha Election 2019 : युतीच्या प्रचार रथावर बाळासाहेबांचे विस्मरण; अटलजींचे मात्र स्मरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:56 PM2019-03-30T12:56:20+5:302019-03-30T12:56:53+5:30

अकोला: भाजपा-शिवसेनेने युतीची घोषणा करून संयुक्तपणे प्रचाराचा राज्यभरात शुभारंभ केला आहे. या प्रचारामध्ये भाजपाने सरकारच्या योजनांचे गुणगान गाणारा डिजिटल प्रचार रथ तयार केला आहे.

Lok Sabha Election 2019: Bjp-shivsen alliance 'Prachar Rath' has no photo of Balasaheb Thackrey | Lok Sabha Election 2019 : युतीच्या प्रचार रथावर बाळासाहेबांचे विस्मरण; अटलजींचे मात्र स्मरण!

Lok Sabha Election 2019 : युतीच्या प्रचार रथावर बाळासाहेबांचे विस्मरण; अटलजींचे मात्र स्मरण!

googlenewsNext

- राजेश शेगोकार
अकोला: भाजपा-शिवसेनेने युतीची घोषणा करून संयुक्तपणे प्रचाराचा राज्यभरात शुभारंभ केला आहे. या प्रचारामध्ये भाजपाने सरकारच्या योजनांचे गुणगान गाणारा डिजिटल प्रचार रथ तयार केला आहे. या रथावरील पोस्टरवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या फोटोला स्थान दिले असले तरी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे मात्र विस्मरण झाले आहे. विशेष म्हणजे, पक्षाचे एकेकाळचे हेवीवेट नेते लालकृष्ण अडवाणी तसेच राज्यातील प्रमुख नेते नितीन गडकरी यांचेही छायाचित्र रथावर लावण्यात आलेले नाही.
अकोल्यातील गल्लीबोळांत सध्या भाजपचा प्रचार रथ फिरत आहे. २७ मार्च रोजी या प्रचाररथाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मित्रपक्ष शिवसेनेसह महायुतीमधील घटक पक्षांना ‘खो’ देण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. त्यावेळी महायुतीमधील शिवसेनेचे पदाधिकारी, विविध पक्षांतील कार्यकर्त्यांच्या अनुपस्थितीमुळे सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले होते. या पृष्ठभूमीवर आता प्रचार रथावर शिवसेनेसाठी आराध्य असलेल्या बाळासाहेबांचाच फोटो रथावर नसल्याने ही बाब सामान्य शिवसैनिकांना चांगलीच खटकली आहे. या प्रचार रथावरून भाजप-शिवसेनेत रुसव्या-फुगव्याचे राजकारण रंगण्याची चिन्हेआहेत. या प्रचार रथावर एका बाजूला भाजपाध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रामदास आठवले आणि रावसाहेब दानवे यांचे फोटो असून, एका बाजूला फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा एकट्याचाच फोटो आहे. फोटोंमधून नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील घटक पक्षाचे नेते महादेव जानकर, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांनाही स्थान मिळालेले नाही.

सदर प्रचार रथ हे मुंबईतूनच तयार होऊन आले आहेत. भाजपा-शिवसेनेच्या समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार हे रथ तयार झाले आहेत. याव्यतिरिक्त काही सूचना नाहीत.
-रमेश कोठारी, भाजपा प्रचार समिती प्रमुख अकोला लोकसभा मतदारसंघ.
 
बाळासाहेब हे आमचे आराध्य आहेत. शिवसैनिकांसह भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठीही त्यांचे विचार प्रेरक आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो आवश्यकच आहे. यासंदर्भात समन्वय समितीकडे विचारणा केली जाईल.
नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख, शिवसेना अकोला.
 

 

Web Title: Lok Sabha Election 2019: Bjp-shivsen alliance 'Prachar Rath' has no photo of Balasaheb Thackrey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.