Lok Sabha Election 2019: बसपा राज्यातील ४८ जागा स्वबळावर लढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:03 PM2019-03-15T15:03:21+5:302019-03-15T15:03:28+5:30
अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी (बसपा) राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढणार असून, त्यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे, अशी माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
- संतोष येलकर
अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी (बसपा) राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढणार असून, त्यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे, अशी माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राज्यात कोणाशीही युती किंवा आघाडी न करता, राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघांत बसपा स्वबळावर निवडणूक लढणार आहे. त्यादृष्टीने पक्षाकडून निवडणुकीची तयारी करण्यात येत असून, उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे साखरे यांनी सांगितले. वाढती बेरोजगारी, महागाई, वाढत्या शेतकरी आत्महत्या, नोटबंदी, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती, बहुजन समाजावरील अन्याय-अत्याचार यासह इतर मुद्द्यांवर बसपा लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष साखरे यांनी स्पष्ट केले.
उमेदवारांची यादी २० मार्चला जाहीर करणार!
लोकसभा निवडणुकीसाठी बसपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १६ मार्च रोजी नागपूर येथील बसपाच्या प्रदेश कार्यालयात घेण्यात येणार असून, राज्यातील ४८ मतदारसंघातील बसपा उमेदवारांची यादी २० मार्च रोजी पक्षामार्फत जाहीर करण्यात येणार असून, बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश, मुंबई व कोकण इत्यादी भागात प्रचार दौऱ्यावर येणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष साखरे यांनी सांगितले.