Lok Sabha Election 2019 : युतीच्या प्रचारात पालकमंत्री अन् शिवसंग्राम नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 01:35 PM2019-04-07T13:35:38+5:302019-04-07T13:39:50+5:30
भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा समावेश तर नाही; मात्र प्रचार फलकावर त्यांच्या फोटोलाही स्थान न दिल्याने या दोन गटातील संघर्ष टोकाचा झाल्याचे चित्र आहे.
अकोला: भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या अकोला लोकसभा मतदारसंघात नामदार-खासदार असे दोन गट पडले असून, या गटांमधील अंतर कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा समावेश तर नाही; मात्र प्रचार फलकावर त्यांच्या फोटोलाही स्थान न दिल्याने या दोन गटातील संघर्ष टोकाचा झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे युतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचाही प्रचारात कुठेही उल्लेख होताना दिसत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’ हा मंत्र देऊन गेल्यावेळी लोकसभा निवडणूक जिंकली; मात्र मोदींनी दिलेल्या या शिकवणीला भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांनीच वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वातील गट अतिशय प्रबळ असा आहे. आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल यांच्यासह दोन नगरसेवक वगळता भाजपाचे सर्व नगरसेवक हे खा. धोत्रे यांचे कट्टर समर्थक आहेत. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे हे खासदार व नामदार अशा दोन्ही गटात दिसतात त्यामुळे धोत्रे यांनी पूर्ण मतदारसंघातील भाजपावर पकड केली आहे. पक्षातील राजकीय वादातून निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे खासदार-नामदार असे दोन गट पडले व या गटांमधील अंतर वाढत गेल्याने खासदार-नामदारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना विरोधी गटातील नेते व पदाधिकारी उपस्थित राहत नाहीत. अकोल्यासाठी हे चित्र आता सवयीचे झाले आहे; मात्र लोकसभा निवडणूक ही पक्षासाठी अतिशय प्रतिष्ठेची अन् सन्मानाची असल्यामुळे भाजपातील सर्व गट-तट ‘फिर एक बार मोदी सरकार’ या घोषणेकरिता एकत्र येतील, अशी अपेक्षा वर्तविली जात होती, ती सुद्धा सपशेल फोल ठरली असून, पालकमंत्र्यांना प्रचारासह फलकांवरही स्थान देण्यात आलेले नाही.
पालकमंत्र्यांना चंद्रपूर, वर्धेसह स्टार प्रचारकाची जबाबदारी
अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे चंद्रपूर व वर्धा अशा दोन मतदारसंघासह स्टार प्रचारकाची जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात मतदान पार पडत असलेल्या या दोन मतदारसंघात पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या दौऱ्यांचे नियोजन तसेच उमेदवाराच्या प्रचारासाठी ते दोन्ही मतदारसंघात सक्रिय आहेत.
मेटेंचे समर्थक प्रचारापासून दूर
भाजपा, शिवसेना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्तेही युतीच्या प्रचारापासून दूरच दिसत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या तिकिटावरून झालेल्या राजकारणामुळे अकोल्यात शिवसंग्राम आणि खासदार गटामध्ये निर्माण झालेली दरी पुढच्या पाच वर्षात रुंदावली आहे. या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी विनायक मेटे यांनी नागपुरात मेळावा घेऊन युती धर्म पाळला आहे; मात्र अकोल्यात शिवसंग्रामला सोबत घेण्यात भाजपानेही पुढाकार घेतला नसल्याची माहिती शिवसंग्रामच्या सूत्रांनी दिली.