Lok Sabha Election 2019 : विकास पडला मागे; सोशल मीडियावर आता जात-पात-धर्माची भाषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:42 PM2019-04-15T12:42:38+5:302019-04-15T12:43:36+5:30
विकासाच्या मुद्यावर होणारी चर्चा बाजूला सारल्या गेली असून, आता पुन्हा एकदा जात-पात धर्माच्या नावावर ‘टिवटिवाट’ सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
अकोला: मतदानाचा अवधी जसजसा जवळ येत आहे, तसा सोशल मीडियावर संदेशांचा अक्षरश: पूर आल्याचे चित्र आहे. सुरुवातीला विकासाच्या मुद्यावर होणारी चर्चा बाजूला सारल्या गेली असून, आता पुन्हा एकदा जात-पात धर्माच्या नावावर ‘टिवटिवाट’ सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यामध्ये तरुणाईकडून रोखठोक व स्पष्ट शब्दात मते व्यक्त केली जात आहेत.
अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षाचे सर्व उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रचाराचा रोख मागील काही दिवसांपासून बदलला असल्याचे चित्र समोर येत आहे. त्याची सर्वाधिक चर्चा सोशल मीडियातील विविध माध्यमांवर खरपूसपणे रंगत आहे. लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासोबतच देशाला मजबूत सरकार देण्याच्या उद्देशातून सर्वपक्षीय उमेदवारांनी मतदारांना आवाहन करणे अपेक्षित असताना या ठिकाणी मतदारसंघाच्या विकासाच्या मॉडेलवर चर्चा न होता, ती आता भरकटल्याचे दिसून येत आहे. विकासाला बाजूला सारत पुन्हा एकदा जाती-पातीचे व धर्माचे परंपरागत हत्यार उपसल्या जात असून, त्यावर फेसबुक, टिष्ट्वटर तसेच व्हॉट्स अॅपवर खमंग चर्चेच्या फैरी झडत आहेत.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी!
सोशल मीडियावर एकमेकांची उणीदुणी काढून तसे संदेश पसरविणारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्रि य असल्याचे दिसून येते. कोणी किती वर्षांत विकास केला, यासोबतच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाची जडणघडण कशी झाली, यावर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नेटिझन्स स्वत:ची मते अत्यंत रोखठोक व स्पष्ट शब्दात व्यक्त करीत आहेत. यामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडताना दिसून येत आहेत.