Lok Sabha Election 2019:विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:18 PM2019-03-15T13:18:20+5:302019-03-15T13:18:26+5:30
वर्धेत काँग्रेसने चारूलता टोकस यांच्या एकमेव नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, तर राष्टÑवादीने बुलडाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही, हे स्पष्टच होत आहे.
राजेश शेगोकार,
अकोला: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातून विस्तारत विदर्भाकडे लक्ष केंद्रित केले होते. स्वाभिमानीचे राष्टÑीय अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी वर्धेतून विदर्भ मोहिमेची सुरुवात करून काँग्रेस आघाडीत सहभागी होण्याकरिता वर्धा व बुलडाणा या लोकसभा मतदारसंघांवर दावा केला होता; मात्र त्यांच्या वाट्याला विदर्भातील एकही जागा येण्याची शक्यता नाही. वर्धेत काँग्रेसने चारूलता टोकस यांच्या एकमेव नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, तर राष्टÑवादीने बुलडाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही, हे स्पष्टच होत आहे.
स्वाभिमानीने काँग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासाठी सहा जागांचा प्रस्तावही औपचारिक स्वरूपात दिला होता. त्यामध्ये हातकणंगले, माढा व विदर्भातील वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांवर त्यांची सर्वाधिक मदार होती. या चार जागांपैकी हातकणंगलेची जागा राष्टÑवादीने शेट्टींसाठी सोडली आहे, तर माढासाठी राष्ट्रवादीतच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे सुबोध मोहितेंसाठी वर्धा व रविकांत तुपकरांसाठी बुलडाणा या दोन जागा निश्चितच मिळाव्यात, हा स्वाभिमानीचा आग्रह होता. या दोन मतदारसंघांसाठी माध्यमातून स्वाभिमानीला विदर्भात राजकीयदृष्ट्या आपली ताकद वाढवायची आहे; मात्र वर्ध्याच्या जागेवर काँग्रेसच्या चारूलता टोकस यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गुरुवारी बुलडाण्यात राष्टÑवादीने डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव जाहीर केल्यामुळे स्वाभिमानीचा विदर्भातील दावा जवळपास संपुष्टात आला आहे. तुपकर हे स्वाभिमानीचा विदर्भातील चेहरा असून, सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी सोडल्यानंतर संघटनेत शेट्टींनंतरचे स्थान त्यांना मिळाले होते. त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाचीही जबाबदारी टाकण्यात आली होती, तर सुबोध मोहितेंच्या रूपाने स्वाभिमानीला आणखी एक चेहरा पूर्व विदर्भात मिळाला होता; मात्र या दोघांनाही अपेक्षित असलेला मतदारसंघ मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्याने आता त्यांच्या भूमिका काय राहतील, यावरही स्वाभिमानीचे विदर्भातील भविष्य ठरणार आहे.