अजूनही रस्ते बंद झालेले नाहीत, मी पुढाकार घेतो; नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 08:21 PM2024-04-04T20:21:08+5:302024-04-04T20:26:08+5:30
Nana Patole on Prakash Ambedkar : आज अकोल्यातील सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना ऑफर दिली आहे.
Nana Patole on Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुका काही दिवसातच होणार आहेत, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांबाबत बैठका सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार याबाबत बैठका सुरू होत्या. पण, आता वंचितने उमेदवार जाहीर केले आहेत. यामुळे आता लोकसभा निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आज अकोल्यातील सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना ऑफर दिली आहे.
'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
"बाळासाहेब मी तुमच्या अकोल्यात येऊन सांगतो अजूनही रस्ते बंद झालेले नाहीत. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे, एक जागा की दोन जागा पाहिजेत. नाना पटोले आपल्या जबाबदारीवर देईल. पण, महाराष्ट्रामध्ये मत विभाजन होऊन देशाला बर्बाद करणारी भाजप निवडून नाही आली पाहिजे, अनुयायी म्हणून मी या ठिकाणी स्विकारतो आहे. अर्ज मागे घेण्यापर्यंत वाट आहे, आमचा प्रस्ताव मान्य असेल तर नाना पटोले निर्णय घेईल, अशी ऑफर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना दिली. 'माझे अधिकार तुम्हाला दाखविलं, असंही नाना पटोले म्हणाले.
"माझे अधिकार काय आहेत, ते तुम्हाला दाखवेल. दिल्ली जायची गरज नाही. तुम्ही घाबरण्याची गरज नाही, तुम्हाला न्याय द्यायची जबाबदारी माझी. स्वातंत्र्यविरांच्या बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपल्याला स्वतंत्र भारतात राहण्यची संधी मिळाली आणि आता पुन्हा आपल्याला परकीयांच्या ताब्यात देणं, हे अजिबात कोणही खपवून घेणार नाही, याची किंमत काँग्रेस पक्षाला कितीही सोसावी लागली तरी चालेल, असंही नाना पटोले म्हणाले. ही लढाई संविधान वाचवण्याची आहे, पद येतील पद जातील. आता ४०० पार झालं तर पुढच्या निवडणुका होणार नाहीत. जेव्हा यांना मोठं बहुमत मिळेल तेव्हा लोकशाही संपेल, असंही पटोले म्हणाले.
"मी पण वंचित"
"मी आज त्यांना प्रस्ताव दिला आहे, अकोल्यात येऊन आव्हान केलं आहे. मी माझे अधिकार वापरतो, मत विभाजन होऊ नये याची आम्ही काळजी घेतोय. संविधान वाचवणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे. त्यांनी प्रत्ताव द्यावा काँग्रेसची तयारी आहे. माझ्याबद्दलचा त्यांच्यात जास्त राग आहे, मी पण वंचित आहे. मी माझ्या अपमानापेक्षा संविधान महत्वाच आहे. दोस्तीचा हात पुढे केला आहे. शिरुरचे बांदल उमेदवार देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दिसत आहे याची त्यांना फक्त आज आठवण करुन दिली.