लोकसभा निवडणूक : आचारसंहिता भंगप्रकरणी ४७ तक्रारी; ३७ निकाली! तथ्य नसल्याने १० तक्रारी रद्द
By संतोष येलकर | Published: April 29, 2024 07:16 PM2024-04-29T19:16:45+5:302024-04-29T19:17:31+5:30
लोकसभा निवडणुकीत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता भंगप्रकरणी तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत ‘सी व्हिजिल ’ ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिलपर्यंत आचारसंहिता भंगप्रकरणी ‘सी व्हिजिल’ ॲपद्वारे विविध प्रकारच्या ४७ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यांपैकी ३० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तथ्य आढळून आले नसल्याने १० तक्रारी रद्द करण्यात आल्या.
लोकसभा निवडणुकीत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता भंगप्रकरणी तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत ‘सी व्हिजिल ’ ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘सी व्हिजिल’ ॲपद्वारे ऑनलाइन प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा शंभर मिनिटांत निपटारा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवसांपर्यंत (२६ एप्रिलपर्यंत) ‘सी व्हिजिल’ ॲपद्वारे आचारसंहिता भंग प्रकरणांत विविध प्रकारच्या ४७ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांपैकी तथ्य आढळलेल्या ३७ तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यात आला. तथ्य आढळून आले नसल्याने उर्वरित १० तक्रारी रद्द करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
अशा आहेत तक्रारी !
९ : निवडणूक प्रचारादरम्यान प्रचाराच्या वेळेची मुदत संपल्यानंतर प्रचार करणे.
१६ : विनापरवानगी प्रचाराचे पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग्ज लावणे.
३ : भेटवस्तूंचे वाटप करणे.
१ : विनापरवानगी स्टेज उभारणे.
१८ : निवडणुकीशी संबंधित इतर प्रकारच्या तक्रारी.