Lokckdown Efect :  ३ हजार चहा विक्रेत्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 10:31 AM2020-04-26T10:31:06+5:302020-04-26T10:31:19+5:30

चहाची दुकानेच बंद असल्याने तब्बल ५० लाखांची रोजची उलाढाल असलेला हा व्यवसाय ठप्प पडला आहे.

Lokckdown Effect: Subsistence crisis in front of 3,000 tea vendors | Lokckdown Efect :  ३ हजार चहा विक्रेत्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट

Lokckdown Efect :  ३ हजार चहा विक्रेत्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट

Next

- सचिन राऊत  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूमुळे संचारबंदी तसेच लॉकडाउन असल्याने जिल्ह्यातील तब्बल ३ हजारांपेक्षा अधिक चहाची दुकाने बंद असल्याने त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट आहे. एक चहा विक्रेता दिवसाला १ हजार ते २ हजार रुपयांचा चहा विक्री करून त्याचा उदरनिर्वाह करतो; मात्र आता चहाची दुकानेच बंद असल्याने तब्बल ५० लाखांची रोजची उलाढाल असलेला हा व्यवसाय ठप्प पडला आहे. त्यामुळे चहा विक्रेत्यांना चांगलाच फटका बसला असून, ते आता मोलमजुरी तसेच एमआयडीसीत सुरू झालेल्या उद्योगांकडे रोजगारासाठी पर्याय शोधत आहेत.
अकोला शहरासह जिल्ह्यात चहा पिणाऱ्यांची मोठी संख्या आहे. प्रत्येक शासकीय कार्यालय, हॉस्पिटल तसेच चौकाचौकात चहाची दुकाने असून, त्यांच्याकडे चहा पिणाऱ्यांची मोठी गर्दी असते; मात्र २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे चहाची दुकाने बंद करण्यात आली आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद असल्याने चहा विक्रेत्यांनाही त्याचा जबर फटका बसला आहे. जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदणी केलेल्या सुमारे ३ हजारांपेक्षा अधिक चहा विक्रेत्यांची दुकाने, हातगाड्या तसेच छोट्या कॅन्टीन बंद असल्याने त्यांची लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. परिणामी चहा विक्री करून संसार चालविणाºया या चहा विक्रेत्यांसमोर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्याची मोठी जबाबदारी पेलण्याचे संकट उभे ठाकले आहे. चहाची दुकाने गत एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून बंद असल्याने त्यांनी आता अन्य रोजगार सुरू केला आहे.


किस्त, उधारी चुकविण्यास अडचणी
चहा विक्रेते रोज बँकेत १०० रुपये तसेच २०० रुपये या प्रमाणे एजंटकडे पैसे गोळा करीत असल्याचे चहा विक्रेत्याने सांगितले; मात्र गत एक महिन्यापासून चहा विक्रीची दुकानेच बंद असल्याने भविष्यातील छोट्या मोठ्या संकटकाळासाठी जमा केलेली ही रक्कम आता बंद करण्यात आली आहे. पर्यायाने हीच रक्कम बँकेतून परत घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यात येत असल्याचेही चहा विक्रेत्यांचे म्हणणे आहे. अशातच बँकेकडून घेतलेले मुद्रा कर्ज तसेच इतर कर्ज आणि उसनवारीचे पैसे चुकविण्यासही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.ू


चहा विक्री करून उदरनिर्वाह तसेच आवश्यक त्या सुविधा कुटुंबीयांना पुरविण्याचा प्रयत्न चहा विक्रीच्या व्यवसायातून करण्यात येतो; मात्र एक महिन्यापासून चहा विक्रीची दुकाने बंद असल्याने चहा विक्रेत्यांसमोर संकटच निर्माण झाले आहे. शासनाने चहा विक्रेत्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी किंवा चहाची दुकाने नियम व अटी घालून सुरू करण्याची परवानगी द्यावी.
-अनुप वर्मा, चहा विक्रेते,
आळशी प्लॉट, अकोला


कोरोनाचे संकट टाळण्यासाठी लॉकडाउन महत्त्वाचे आहे. चहाची दुकाने बंद असली तरी त्याचा फटका आमच्यासारख्या काही चहा विक्रेत्यांना बसला आहे. या काळात संसाराची गाडी हाकण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे; मात्र ही वेळही निघून जाईल आणि पूर्वीसारखे व्यवसाय आणि उद्योग सुरू होतील; मात्र त्यासाठी आपण प्रत्येकाने घरात राहून प्रशासनास सहकार्य करण्याची सध्या गरज आहे. संकटाचे दिवस निघून जातील.
-पंकज पाटील, चहा विक्रेते,
गांधी रोड, अकोला.

 

Web Title: Lokckdown Effect: Subsistence crisis in front of 3,000 tea vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.