लोककवी विठ्ठल वाघ यांचा अमृत महोत्सव रविवारी अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 03:09 PM2020-01-17T15:09:06+5:302020-01-17T15:09:12+5:30
रविवार, १९ जानेवारी रोजी डॉ. विठ्ठल वाघ यांचा अमृत महोत्सव सोहळा आयोजित केला आहे.
अकोला: लोकगीताची लय, ज्ञानेश्वरीतील पावित्र्य, तुकोबांचा रोखठोकपणा घेऊन कास्तकारांचे सुख-दु:ख शब्दबद्ध करणारा, कास्तकारांच्या दु:खाला वाचा फोडताना व्यवस्थेविरुद्ध बिगुल फुंकणारा लोककवी म्हणजे प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ. सिनेमा, गीत, गद्य-पद्य, ललित अशा साहित्याच्या विविध छटा उमटवत साहित्य आणि संस्कृतीचे आभाळ कवेत घेणाऱ्या या दीपस्तंभाचा अमृत महोत्सव. यानिमित्ताने रविवार, १९ जानेवारी रोजी डॉ. विठ्ठल वाघ यांचा अमृत महोत्सव सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये अमृत महोत्सव समितीच्यावतीने डॉ. वाघ यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष शिरीष धोत्रे यांनी दिली.
गुरुवारी शिवाजी महाविद्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत धोत्रे यांनी सोहळ्याविषयी माहिती दिली. सोहळ्याचे संयोजक म्हणून धनंजय मिश्रा व विठ्ठल कुलट काम पाहत आहेत. सोहळ्याचे संचालन हास्यकवी किशोर बळी करतील. या सोहळ्याला महाराष्ट्रातील नामवंत कवींची उपस्थिती राहणार आहे. अमृत महोत्सवामध्ये डॉ. विठ्ठल वाघ यांचे समग्र जीवनकार्याचे व त्यांच्या कवी साहित्याचे, लेखाचे, ओव्यांचे व त्यांचे समकालीन व नंतरच्या कवींचे, लेखकांचे लेख सर्वसामान्य वाचकांपर्यंत व अभ्यासकापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘साहित्य पंढरी विठ्ठल’ हा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख राहतील. प्रमुख अतिथी म्हणून मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकारचे राज्यमंत्री अॅड़ संजय धोत्रे उपस्थित राहतील. यावेळी सिनेदिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष प्रा. तुकाराम बिडकर असून, प्रशांत देशमुख आणि प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे निमंत्रक आहेत, असे धोत्रे यांनी सांगितले.
दोन क्विंटल शेणाचा केक!
या महोत्सवात दोन क्विंटलचा शेणाचा केक कापण्यात येणार आहे. डॉ. विठ्ठल वाघ हे शेती आणि मातीशी इमान राखणारे लोककवी असल्यामुळे ही आगळी-वेगळी संकल्पना साकारण्यात येणार आहे. हा शेणाचा केक कापल्यानंतर एनसीसीचे विद्यार्थी एक हजार वृक्षांना खत देणार आहेत.
कवी संमेलनाची मेजवानी
या महोत्सवानिमित्त अकोलेकरांना महाराष्ट्रातील नामवंत कवींचा सहभाग असलेल्या कवी संमेलनाची मेजवानी मिळणार आहे. विविध विषयांवरील कवितांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
श्री शिवाजी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यासाठी आॅनलाइन नोंदणी सुरू आहे.
फोटो: विठ्ठल वाघ यांचा घेणे