Loksabha Election 2019 : अकोला पूर्व-पश्चिम, अकोटचा कौल कोणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 01:49 PM2019-05-20T13:49:34+5:302019-05-20T13:50:48+5:30
यावेळी भाजपाचे मताधिक्य कमी करण्यात काँग्रेस व वंचितमध्ये असलेली स्पर्धा कितपत यशस्वी झाली, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीचेच चित्र पुन्हा उभे ठाकले असल्याने मत विभाजनावरच निवडणुकीचा निकाल फिरणार असल्याचे स्पष्ट आहे. गतवेळी काँग्रेसने खेळलेली खेळी यावेळी कायम आहे तसेच २०१४ ची मोदी लाट यावेळी नव्हती आणि अॅड. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा नवा पॅटर्न घेऊन रिंगणात होते. २०१४ च्या निवडणुकीत अकोट, अकोला पूर्व व अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघांनी भाजपाला सर्वाधिक कौल दिला होता. त्यामुळे यावेळी भाजपाचे मताधिक्य कमी करण्यात काँग्रेस व वंचितमध्ये असलेली स्पर्धा कितपत यशस्वी झाली, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट, अकोला पूर्व व अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघात भाजपाने विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपानेच यशाचे झेंडे रोवले आहेत. अकोट मतदारसंघात भाजपाने नगरपालिका जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले. या मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली असून, शिवसेनाही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडून भाजपाला सर्वाधिक आशा आहे. गतवेळी संजय धोत्रे यांना मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते येथे मिळतील, असा दावा भाजपाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, हा मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांचे होम ग्राउंड असल्याने त्यांनाही या मतदारसंघातून मोठ्या मतांच्या शिदोरीची अपेक्षा आहे. गतवेळी पटेल यांच्यापेक्षा धोत्रे यांनी तब्बल ३२ हजार ४२४ मते अधिक घेतले होते. यावेळी मात्र या मताधिक्यात घट येईल, असा दावा काँग्रेस करीत आहे. दुसरीकडे वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांचा हा मतदारसंघ असल्याने अॅड. प्रकाश आंबेडकर यांना गतवेळीच्या तुलनेत अधिक मते मिळवून देण्याचा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
अकोला पूर्व व पश्चिम हे अकोला महापालिका क्षेत्रात येणारे मतदारसंघ आहेत. आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर प्रतिनिधित्व करीत असलेल्या या मतदारसंघात भाजपाचा वरचष्मा राहील, असाच दावा पक्षाकडून होत आहे. महापालिकेच्या निवडणुकीत अकोला पूर्वमध्ये येणाऱ्या आठ प्रभागांमधून तब्बल सात प्रभांगामध्ये एकहाती पॅनल विजयी करीत आ. सावरकर यांनी आपला प्रभाव अधोरेखित केला होता, तर अकोला पश्चिममध्ये तब्बल २० नगरसेवक भाजपाचे आहेत. त्यामुळे भाजपाचा गड कायम राहील, अशी चर्चा आहे. या दोन्ही मतदारसंघांत गतवेळी भाजपाने मताधिक्य घेतले होते; मात्र अकोला पश्चिममध्ये काँगे्रसने लक्षणीय मते घेऊन आपली ताकद स्पष्ट केली होती. यावेळीसुद्धा पटेल यांच्यासाठी अकोला पश्चिममधील मुस्लीम समाज एकवटला होता. त्यामुळे परंपरागत मतांच्या जोडीने काँग्रेस येथे तगडी फाइट देईल, अशी चर्चा आहे. दुसरीकडे अॅड. आंबेडकरांना अकोला पूर्व या मतदारसंघात गतवेळी दुसºया क्रमांकाची मते होती. त्यामुळे यावेळी या मतांमध्ये निश्चितच वाढ होईल, असा दावा वंचितकडून केला जात आहे. आ. सावरकर यांच्या मतदारसंघातील ग्रामीण भाग हा भाजपाकडे जातो की वंचितकडे कायम राहतो, कोणत्या मतदारसंघात काय चालले, याचीच चर्चा असून, त्यावरूनच विजयाची गणिते मांडली जात आहेत.