Loksabha Election 2019 : वाढीव मतदान भाजपच्याच पारड्यात; पक्षाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 02:17 PM2019-05-16T14:17:38+5:302019-05-16T14:17:48+5:30
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयाची हॅट्ट्रिक मारलेल्या भारतीय जनता पार्टीला यंदा चौथ्यांदा सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विश्वास आहे.
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयाची हॅट्ट्रिक मारलेल्या भारतीय जनता पार्टीला यंदा चौथ्यांदा सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विश्वास आहे. २०१४ च्या तुलनेत यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत मतदानात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये १ लाख ४४ हजार ४७८ नवीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, ही वाढीव टक्केवारी भाजपच्याच पारड्यात असून, निष्ठावान कार्यकर्त्यांमुळे खासदार अॅड. संजय धोत्रे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील थोरात यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर निवडणुकीला सामोरे गेल्यामुळे काही अंशी चुरस निर्माण झाली होती. २००४ मध्ये पार पडलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाचा नारा दिला आणि तेव्हापासून या मतदारसंघावर भाजपचे खासदार अॅड. संजय धोत्रे यांनी विजयाची पताका कायम ठेवली. २००४ ते एप्रिल २०१९ पर्यंत पार पडलेल्या लोकसभेच्या सर्व निवडणुकीत काँग्रेस आणि अॅड. आंबेडकर यांचे सूर जुळत नसल्याची बाब भाजपच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसून आले आहे. जिल्हाभरात भाजपचे मजबूत नेटवर्क, निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज, चोख नियोजन आणि यात भरीस भर दिमतीला असलेली शिवसेनेची तगडी यंत्रणा आदी बाबी लक्षात घेतल्यास गत निवडणुकीपेक्षाही यंदा सर्वाधिक मते भाजपलाच मिळतील, असा विश्वास भाजपच्या गोटातून वर्तविला जात आहे.
२००९ मधील निवडणुकीत खा. अॅड. संजय धोत्रे यांना २ लाख ८७ हजार ५२६ मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ४ लाख ५६ हजार ४७२ मते मिळाली होती. यंदा मतदानाची वाढीव टक्केवारी भाजपच्याच पथ्यावर पडणार, हे निश्चित आहे.
-तेजराव थोरात पाटील, जिल्हाध्यक्ष भाजप.