यंदाच्या ऑक्टोबरमध्येच निवडणुका; आंबेडकरांनी सांगितलं नोटबंदीचं गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 12:23 PM2023-05-21T12:23:46+5:302023-05-21T12:26:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनपासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांना महिन्यातून किमान एकदा तरी भेट देतील.
अकोला - राज्यातील महायुती सरकारवर अद्यापही आमदारांच्या अपात्रतेची टांगतील तलवार आहे. तर, नुकतेच कर्नाटक निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे, मध्यावधी निवडणुका होतात की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅटट्रिक करण्याची तयारी सुरू केली आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी २००० रुपयांची नोट चलनातून बंद केल्यामुळेही केंद्र सरकार पुन्हा चर्चेत आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मध्यावधी निवडणुकांचे भाकीतच व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनपासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांना महिन्यातून किमान एकदा तरी भेट देतील. तसेच, सरकारी योजनांचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने निवडणुकांचीही तयारी सुरू करणार आहेत. मोदी सरकारला ३० मे रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, भाजपने आत्ताच २०२४ ची तयारी सुरू केली आहे. त्यातच, अचानक २००० रुपयांच्या नोटबंदी निर्णय घेतल्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. तर, भाजप समर्थक मोदी सरकारची रणनिती पटवून देत आहेत. या दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होतील, असं भाकीत केलंय.
येणाऱ्या ऑक्टोबर मध्ये होणार लोकसभेच्या निवडणुका होतील. २००० च्या नोटा बंद करून निवडून घेण्यासाठी भाजपचे चोकिंग राजकारण सुरू केल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. विरोधकांना निधी मिळू नये आणि विरोधकांकडे निधी येऊ नये. या दृष्टीने टाकलेला हा खेळ आहे. त्यामुळे येथील राजकीय पक्षाने गाफील राहू नये, असे म्हणत ऑक्टोबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतील, असे भाकीतच आंबेडकर यांनी केलंय. त्यामुळे, आता खरंच भाजपाकडून निवडणुकांची तयारी सुरू झालीय का, असाही प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आला आहे.
नोव्हेंबरमध्ये ५ राज्यांच्या निवडणुका
दरम्यान, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान मोदींनी राजस्थान आणि मध्य प्रदेशचा दौरा सुरू केला आहे.