सर्वोपचार रुग्णालयात दलालांवर करडी नजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:12 PM2019-12-28T12:12:58+5:302019-12-28T12:13:04+5:30
दलाल सर्वोपचार रुग्णालय परिसरात दिसताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठातांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात गरीब रुग्णांची लूट करणाऱ्या दलालांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची करडी नजर असून, अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे दलालांवर कारवाई करण्याची विनंती केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यासह लगतच्या बुलडाणा, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी रुग्णांना उपचारासंदर्भात योग्य माहिती मिळत नसल्याने हेलपाटे घ्यावे लागतात. हीच बाब हेरून येथील दलाल मदतीच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर तसेच आमदार गोवर्धन शर्मा यांनी अधिष्ठाता यांच्या दालनात २४ डिसेंबर रोजी बैठक घेऊन दलालांचा बंदोबस्त लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या बैठकीनंतर लोकमतच्या वृत्ताची दखल घेत अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी सर्वोपचार रुग्णालयातील सर्वच सुरक्षा रक्षकांना दलालांवर विशेष लक्ष देण्याबाबत सूचना दिल्यात. शिवाय, या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनाही पत्राद्वारे दलालांवर कारवाईबाबत विनंती केली आहे.
रुग्णालय परिसरात दिसताच कारवाई
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन चार दलालांवर वॉच ठेवून असल्याची माहिती आहे. हे चारही दलाल सर्वोपचार रुग्णालय परिसरात दिसताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठातांनी दिली आहे.
डॉक्टरांच्या मर्जीतले दलाल मात्र मोकाट
सर्वोपचार रुग्णालयातील चार दलाल रडारावर असले, तरी काही दलाल हे वॉर्ड बॉयच्या वेशात फिरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे दलाल डॉक्टरांच्या मर्जीतले असून, या प्रकरणात त्यांना झुकते माप दिल्या जात आहे. शिवाय, काही कर्मचाऱ्यांचे नातेवाईक देखील येथे दलाली करत असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात यातल्याच एक ादलालाचे पितळ उघडे झाले होते; परंतु संबंधित व्यक्ती येथीलच एका कर्मचाºयाचा नातेवाईक असल्याने त्याला सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.