हॉटेल व्यावसायिकांवर अन्न-औषध प्रशासनाची नजर

By Admin | Published: October 9, 2015 02:00 AM2015-10-09T02:00:31+5:302015-10-09T02:00:31+5:30

खाद्यपदार्थ उत्पादन, विक्रीचे बुलडाणा जिल्ह्यात १८0२ परवाने.

The look of the Food and Drug Administration at Hotel Professional | हॉटेल व्यावसायिकांवर अन्न-औषध प्रशासनाची नजर

हॉटेल व्यावसायिकांवर अन्न-औषध प्रशासनाची नजर

googlenewsNext

बुलडाणा : खाद्यपदार्थाची विक्री करण्यासाठी अथवा त्याची उलाढाल करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना काढणे किंवा नोंदणी करणे बंधनकारक असताना जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर विनापरवाना हॉटेल, दुकाने सुरू असून, अशा विक्रेत्यांवर आता अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. त्यामुळे विनापरवाना व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात सध्या १८0२ उत्पादक व मोठय़ा व्यावसायिकांनी अधिकृत परवाने काढले आहेत, तर ८८६३ किरकोळ विक्रेते व व्यावसायिकांनी अन्न व प्रशासन विभागाकडे नोंदणी केली आहे. ज्या व्यावसायिकांचे उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना वार्षिक १00 रुपये शुल्क भरून नोंदणी करता येते तसेच १२ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल व उत्पन्न असलेल्यांना २000 रुपये शुल्क भरून परवाना काढण्याची तरतूद आहे. मोठे व्यावसायिक उत्पादक असेल, तर तीन ते पाच हजार रुपये भरावे लागतात; परंतु जिल्ह्यातील अनेक उत्पादक व किरकोळ विक्रेत्यांनी अद्यापही अन्न व प्रशासन विभागाकडे नोंदणी किंवा परवाना काढला नाही. परवाना किंवा नोंदणी नसताना जिल्ह्यात आजही हजारो व्यावसायिक व्यवसाय करीत असून, अशा व्यावसायिकांवर एफडीएची नजर राहणार आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे अन्न प्रशासन विभागाने सांगितले. बुलडाणा जिल्ह्यात सध्या अन्नप्रक्रिया करणार्‍या उत् पादकांनी जिल्ह्यात ९३ अधिकृत परवाने घेतले, तर २७५ व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ११ मोठे परवानाधारक दूध संकलन केंद्रे आहेत, तर ४३ नोंदणीधारक आहेत. पाच परवाने खाद्यतेल प्रक्रिया उद्योग व्यावसायिकांचे आहेत, तर पाच केंद्रीय परवानाधारक आहेत. जिल्ह्यात एकूण नोंदणीकृत ११ परवानाधारक आहेत, तर माल साठवण गोदामाची संख्या ६0 आहे. परवानाधारक किरकोळ विक्रेते ४00 असून, नोंदणी केलेले विक्रेत ५६0३ आहेत. होलसेल वितरण परवानाधारक ६६३ असून, नोंदणी केलेले १८ आहेत., तर १0६ परवानाधारक वितरक आणि १४ नोंदणीकृत वितरक आहेत. वाहतूक परवाने १६ आहेत. जिल्ह्यात कॅटरिंगचा व्यवसाय करणारे परवानाधारक ४४ असून, नोंदणी केलेले १0 आहेत. मुख्य रस्त्यांवर लागणार्‍या नोंदणीकृत धाब्यांची संख्या ११ असून, नोंदणी केलेले धाबे ४५८ आहेत. क्लब कँटीनची संख्या सहा आहे. जिल्ह्यात हॉटेल १३६ असून, नोंदणी केलेले हॉटेल १५२ आहेत. रेस्टॉरंट परवानाधारकांची संख्या १४२ असून, ३७६ नोंदणीकृत रेस्टॉरंट आहेत. याशिवाय किरकोळ व्यवसायिकांची संख्या १९00 एवढी आहे. या व्यतिरिक्त हजारो व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. मिठाईच्या दुकानांवर प्रशासनाचे लक्ष सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. गणेश-गौरी पूजन आटोपले; आता दिवाळी-दसर्‍याची तयारी सुरू झाली आहे. या काळात मिठाईची मोठय़ा प्रमाणावर विक्री होते. मिठाईच्या दुकानात आतापासून विविध पदार्थ बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणावर भेसळ होत असल्याची प्रकरणे दरवर्षी उघडकीस येतात. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाला सतर्क राहावे लागते. मिठाई बनविताना खव्यामध्ये तसेच दूध, तेल किंवा तुपामध्ये दुकानदाराकडून भेसळ होण्याची शक्यता असते. या भेसळीमुळे नागरिकांच्या जीवि ताला धोका होतो. त्यावर नजर ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आतापासून कंबर कसली आहे.

Web Title: The look of the Food and Drug Administration at Hotel Professional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.