एन-९५ मास्कच्या नावाखाली अकोलेकरांची आर्थिक लुबाडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:28 AM2020-09-29T11:28:47+5:302020-09-29T11:29:08+5:30
शासनाने प्रमाणित केलेल्या एन-९५ मास्कनुसार हुबेहुब बनावट मास्कची विक्री करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक केली जात आहे.
अकोला: संपूर्ण जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती व धास्ती निर्माण झाली आहे. या बाबीचा गैरफायदा उचलत व्यावसायिकांकडून अकोलेकरांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचे समोर आले आहे. ह्यएन-९५ह्ण मास्कच्या नावाखाली बोगस मास्कची चढ्या दराने विक्री करून नागरिकांची आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष पाहता संशयाचे धुके निर्माण झाले आहे.
संसर्गजन्य कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण महापालिका क्षेत्रात ७ एप्रिल रोजी आढळून आला होता. जून महिन्यापर्यंत शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले. मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांच्या वाढत्या संख्येपाठोपाठ आता महापालिका क्षेत्रातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा स्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये धास्ती व भीतीचे वातावरण पसरले आहे. सहाजिकच पर्यायी उपाययोजना करण्यात नागरिकांचा कल दिसून येत आहे. घराबाहेर निघताना तोंडाला मास्क लावणे जिल्हा प्रशासनाने व मनपा प्रशासनाने अनिवार्य केल्यामुळे नागरिकांचा ओढा उच्च दर्जाचा मास्क खरेदीकडे असल्याचे दिसत आहे. या सर्व बाबींचा गैरफायदा जिल्ह्यासह शहरातील व्यावसायिकांकडून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. शासनाने प्रमाणित केलेल्या एन-९५ मास्कनुसार हुबेहुब बनावट मास्कची विक्री करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक केली जात आहे.
जिल्हा व मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष का?
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एन-९५ च्या नावाखाली बनावट व दर्जाहीन मास्कची खुलेआम चढ्या दराने विक्री केली जात आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना सातत्याने आवाहन करणाºया जिल्हा प्रशासन व मनपाचे या आर्थिक लुटीकडे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दंडाची रक्कम पथकांच्या खिशात
तोंडाला मास्क किंवा रुमाल न बांधता घराबाहेर निघणाºया वाहनचालकांना दंड ठोठावण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या सूचनेनुसार पथकांचे गठन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह मनपाच्या आरोग्य निरीक्षकांचाही समावेश होता. या पथकांनी केलेली थातुरमातुर कारवाई वादाच्या भोवºयात सापडली आहे. कारवाई करताना दंडाची काही रक्कम पथकांच्या खिशात गेल्याची चर्चा आहे.
बोगस मास्कची चढ्या दराने विक्री; प्रशासकीय यंत्रणांचा कानाडोळा
२०० रुपयांत ट्रिपल लेअर मास्क
शासनाने प्रमाणित केलेल्या एन-९५ मास्कची यापूर्वी केवळ मेडिकल स्टोअर्समधून विक्री केली जात होती. आता सरसकट जनरल स्टोअर्स, किराणा दुकानांमध्येही अशा प्रकारचे नानाविध मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये दोनशे रुपयात ट्रिपल लेअर मास्क ची विक्री केली जात आहे. या मास्कच्या दर्जाबद्दल संबंधित विक्रेत्याला विचारणा केली असता, त्याने असमर्थता व्यक्त केली.
रंगबिरंगी मास्क खरेदीकडे ओढा
मास्क वापरणे अनिवार्य झाल्यामुळे महिला व लहान मुलांचा ओढा रंगबिरंगी मास्क खरेदी करण्याकडे असल्याचे बाजारात आढळून आले. यामध्ये अवघ्या ३0 रुपयांपासून ते ७0 रुपयांपर्यंत विविध रंगांचे मास्क विक्रीसाठी उपलब्ध होते.