अकोला शहर विभागात विजेची सर्वाधिक वितरण हानी
By atul.jaiswal | Published: February 10, 2018 05:03 PM2018-02-10T17:03:12+5:302018-02-10T17:14:50+5:30
अकोला : राज्यात सर्वत्रच वीज वितरण हानी होत असली, तरी अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला शहर विभागात वीज हानीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : राज्यात सर्वत्रच वीज वितरण हानी होत असली, तरी अकोला परिमंडळाअंतर्गत येत असलेल्या अकोला शहर विभागात वीज हानीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. संपूर्ण राज्यातील वीज गळतीचे प्रमाणे १४ ते १५ टक्के असताना, अकोला परिमंडळातील अकोला शहर विभागात हे प्रमाण तब्बल ३४.१५ टक्के एवढे आहे. ही हानी व गळती कमी करण्यासाठी सातत्त्याने विविध प्रयत्न व उपाययोजना केल्यानंतरही महावितरणला अपयश आल्याने अखेर अकोला शहर विभाग खासगी कंपनीला चालविण्यासाठी देण्याचा अर्थात ‘फ्रॅन्चायझी’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणच्या मुख्य कार्यालयाने अकोला शहर विभाग येथे फ्रेंचायजी नियुक्तीसाठी २० फेब्रुवारी २०१८ पर्यंत प्रस्ताव मागविले आहेत.
महावितरणने वीज गळती व चोरीचे प्रमाण अधिक असलेल्या ठाणे परिमंडळातील शीळ, मुंब्रा, कळवा हे तीन उपविभाग, नाशिक परिमंडळातील मालेगाव शहरातील तीन उपविभाग व अकोला परिमंडळातील अकोला शहर विभागाची फ्रॅन्चायझी खासगी कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रेंचायजी नियुक्तीसाठी प्रस्ताव मागितलेल्या अकोला शहर
विभागामध्ये एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत वितरण हानी ३२.३३ टक्के होती. तर त्यानंतर एप्रिल २०१७ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत ही वितरण हानी वाढून ३४.१५ टक्क्यांवर आली आहे.अकोला शहर विभागातील वीज देयक वसुलीचे प्रमाण कमी असून, वीज देयकांबाबतच्या तक्रारी व वीज चोरीचे प्रमाणही मोठे आहे. वीज गळतीचे प्रमाण रोखण्यात अपयश येत असल्यामुळे फ्रॅन्चायझी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
काय आहे फ्रॅन्चायझी?
फ्रॅन्चायझी नेमणे म्हणजे खाजगीकरण नव्हे तर फ्रॅन्चायझी ही महावितरणचे प्रतिनिधी म्हणूनच काम करते. विजेची गळती कमी तसेच वीज बिल वसुली वाढल्यास भाविष्यात भारनियमनाचा प्रश्नच राहणार नाही,परिणामी ग्राहकांना लाभ होईल. यापूर्वी फ्रॅन्चायझी दिलेल्या ठिकाणी वितरण व वाणिज्य हानी घटून ग्राहकांना लाभ झाल्याचे भिवंडी येथील उदाहरण आहे. महावितरण प्रमाणेच फ्रॅन्चायझी मध्ये ग्राहकांचे हक्क अबाधित राहतील.