अज्ञात रोगामुळे तीन एकरातील कपाशी पिकाचे नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:25 AM2021-09-10T04:25:47+5:302021-09-10T04:25:47+5:30
शिरपूर येथील रहिवासी शेख आसीम व नासेहा अंजुम यांची चांगेफळ शिवारात सामूहिक क्षेत्र सर्व्ह नंबर ४८/ १, एक हेक्टर ...
शिरपूर येथील रहिवासी शेख आसीम व नासेहा अंजुम यांची चांगेफळ शिवारात सामूहिक क्षेत्र सर्व्ह नंबर ४८/ १, एक हेक्टर ६२ आर असे तीन एकर शेतीमध्ये बँक व सावकाराकडून व्याजाने कर्ज काढून कपाशी पिकांची पेरणी केली होती. परंतु गेल्या आठवडाभरापूर्वी अज्ञात रोगामुळे तीन एकरातील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. तीन एकरातील कपाशी पेरणीसाठी आतापर्यंत जवळपास ७० ते ८० हजार रुपये खर्च लावण्यात आला. मात्र या कपाशी पिकावर लावण्यात आलेला खर्च पाण्यात गेला आहे. याबाबत शेतकरी शेख आसीम यांनी वारंवार कृषी विभागाशी संपर्क केला. मात्र, अद्यापही प्रतिसाद मिळाला नाही, अखेर आठवडाभरानंतर कृषी विभागाच्या संबंधितांनी आठवडाभरानंतर शेतात भेट दिली, पंचनामा करून शेतकऱ्याची स्वाक्षरी घेऊन पंचनामा कृषी विभागाच्या वरिष्ठाकडे सादर करणे अपेक्षित होते. परंतु, थातूरमातूर पाहणी करून, फोटो काढून निघून गेल्याचा आरोप शेतकरी शेख आसीम यांनी केला आहे. सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
कृषी विभागाच्या दिरंगाईमुळे शेतकरी हतबल
शेतकरी शेख आसीम यांच्या शेतातील अज्ञात रोगामुळे तीन एकरातील कपाशीचे नुकसान झाले, वारंवार संपर्क केल्यानंतर अखेर आठवडाभरानंतर कृषी विभागाने धडक दिली, कपाशीचा पंचनामा करणे अपेक्षित असताना थातूरमातूर पाहणी करून फक्त फोटो काढण्यात आले. त्यामुळे कृषी विभागाच्या दिरंगाईमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
फोटो:
त्या कपाशी पिकाची पाहणी करण्यात आली असून, कपाशी पिकावर तणनाशक फवारणी केली आहे. तसेच पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल.
-धनंजय शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर
गेल्या आठ दिवसांपासून तीन एकरातील कपाशी पिकावर रोग आल्यामुळे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी विभागाशी वारंवार संपर्क केला. परंतु, आठ दिवसांनंतर पंचनामा करणे अपेक्षित असताना थातूरमातूर पाहणी करून फोटो काढण्यात आले.
-शेख आसीम, शेतकरी चांगेफळ