कमावता व्यक्ती गमावला; जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना मदतीचा आधार; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
By संतोष येलकर | Published: December 22, 2023 06:42 PM2023-12-22T18:42:54+5:302023-12-22T18:43:02+5:30
वारसांच्या खात्यात जमा होणार
अकाेला : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबास २० हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली जाते. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत कुटुंबातील कमावता व्यक्ती गमावलेल्या जिल्ह्यातील कुटुंबांना सानुग्रह मदत वितरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गुरुवारी दिला. त्यामुळे कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ३१६ कुटुंबांतील वारसांच्या खात्यात लवकरच सानुग्रह मदतीची रक्कम जमा करण्यात येणार असून, संबंधित कुटुंबांना मदतीचा आधार मिळणार आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबांतील कमावत्या आणि कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वर्षभरात संबंधित कुटुंबास वीस हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली जाते. त्यानुसार गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या कुटुंबातील वारसांकडून संबंधित तहसील कार्यालयांकडे सानुग्रह मदतीसाठी अर्ज करण्यात आले. जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडे प्राप्त झालेल्या अर्जानुसार गरीब कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ३१६ कुटुंबांना सानुग्रह मदत वितरित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी कुंभार यांनी २१ डिसेंबर रोजी दिला. मदतीची ही रक्कम तहसील कार्यालयामार्फत कमावती व्यक्ती गमावलेल्या संबंधित कुटुंबातील वारसांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
मदत मंजूर केलेल्या
कुटुंबांची अशी आहे संख्या !
तालुका संख्या
अकोला शहर ६०
अकोला ग्रामीण ५०
बार्शिटाकळी १४
अकोट ५५
तेल्हारा ४२
बाळापूर २५
पातूर ३०
मूर्तिजापूर ४०
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ३१६ कुटुंबांना सानुग्रह मदत वितरित करण्याचा आदेश दिला आहे. सानुग्रह मदतीची रक्कम जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमार्फत संबंधित कुटुंबातील वारसांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
अजित कुंभार,
जिल्हाधिकारी, अकोला