बंधूप्रेमापेक्षा प्रियकराचे प्रेम वरचढ!
By admin | Published: June 2, 2017 01:49 AM2017-06-02T01:49:40+5:302017-06-02T01:49:40+5:30
भावाचे प्रयत्न निष्फळ: पाणावल्या डोळ्यांनी भाऊ परतला
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: आईचे निधन झाल्यानंतर सावत्र भावाने तिचा सांभाळ केला. सख्ख्या बहिणीपेक्षाही तिच्यावर प्रेम केले. तिला हवे ते दिले. शिक्षणासाठी अकोल्यात पाठविले. सख्ख्या बहिणीसारखे प्रेम देऊन भावाने आपल्यासाठी केलेल्या कर्माची जाण न ठेवता, बहिणीने प्रियकराला जवळ केले. बंधूप्रेमासमोर तिचे प्रियकरावरील प्रेम वरचढ ठरले.
एखाद्या चित्रपटातील कथानक वाटावी अशीच घटना गुरुवारी उशिरा रात्री सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात घडली. रिसोड येथे राहणाऱ्या भावाने आईच्या निधनानंतर सावत्र बहिणीचा सांभाळ केला. तिला सर्वकाही दिले. शिक्षणासाठी तिला अकोल्यात पाठविले.
शिक्षण घेताना, बहिणीचे न्यू तापडिया नगरातील एका युवकासोबतच प्रेमसंबंध जुळले. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले. सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या. बहिणीच्या प्रेमप्रकरणाची माहिती भावाला मिळाल्यावर त्याने तिची समजूत घातली; परंतु बहिणीने तिच्या मनाप्रमाणेच वागायचे ठरविले. अशातच दोघे लग्न करणार असल्याची माहिती भावाला मिळाली. त्याने गुरुवारी सायंकाळी अकोला गाठले.
अकोल्यात आल्यावर सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेत, बहिणीची प्रियकराच्या ताब्यातून सुटका करण्याची विनंती केली. पोलिसांनी बहीण व तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी भावाने बहिणीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु बहीण दोन दिवसाच्या प्रेमापुढे भावाला भीक घालत नव्हती.
तिने आम्ही दोघांनी लग्न केल्याचे पोलिसांना सांगितले. बहीण सज्ञान असल्याने, पोलिसांना कारवाई करता आली नाही. भावाने तिला घरी चलण्याची विनंती केली; परंतु बहिणीने भावाला स्पष्ट नकार देत, प्रियकराला जवळ केले. भावाच्या प्रेमापुढे प्रियकराचे प्रेम वरचढ ठरले. भावाने पाणावल्या डोळ्यांनी पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला.