मोर्णा धरणाच्या पायथ्याशी प्रेमी युगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:24 AM2020-01-29T10:24:10+5:302020-01-29T10:24:28+5:30
पास्टूल येथील युवक पदवीच्या प्रथम वर्षात शिकत होता. तर युवती इयत्ता नववीमध्ये शिकत होती
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : नात्यातील असल्याने कुटुंबीयांकडून प्रेमाला विरोध होत असल्याने पास्टूल येथील प्रेमी युगुलाने मोर्णा धरणाच्या पायथ्याशी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २८ जानेवारी रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.
पास्टूल येथील युवक पदवीच्या प्रथम वर्षात शिकत होता. तर युवती इयत्ता नववीमध्ये शिकत होती. हे दोघेही २६ जानेवारीच्या दुपारपासून घरून निघून गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी दोघांचाही शोध घेतला असता ते आढळले नाही. २८ जानेवारी रोजी मोर्णा धरणाजवळ गुरे चारणाऱ्यांना या दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळले. दोघेही एकाच समाजातील असून, नात्यातील असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांना सदर मृतदेह काढण्यास तीन तासांपासून गावकऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने, उपनिरीक्षक गणेश नावकार, पोहेकाँ धर्मेंद्र ठाकूर, सोहेल खान, मोहोळ तथा सास संस्था आणि आपत्कालीन पथकाचे प्रमुख दुलेखा आदी तळ ठोकून आहेत. (वार्ताहर)