अकोला जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 02:06 PM2017-12-20T14:06:05+5:302017-12-20T14:12:17+5:30
अकोला : सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणाºया कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक्षण विभागाने एकाही कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाई केलेली नाही.
अकोला : सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणाºया कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक्षण विभागाने एकाही कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाई केलेली नाही.
विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नावापुरता प्रवेश घेऊन शिकवणी वर्गांना महत्त्व देतात. कनिष्ठ महाविद्यालयेसुद्धा प्रवेश क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने तुम्ही केवळ प्रवेश घ्या, उपस्थितीचे आम्ही पाहू, असे सांगत होते. त्यामुळे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना वर्षभर दांडी मारतात आणि परीक्षेच्या तोंडावर केवळ प्रॅक्टिकलपुरते उगवतात. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हे चित्र दिसून येत आहे. शिकवणी वर्गांमध्ये हजारो विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालये ओस पडलेली दिसून येतात. ही बाब माध्यमिक शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्याने शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी यंदा जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्याबाबत बजावले होते. कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना विद्यार्थ्यांची ७० टक्के उपस्थिती नसल्यास त्याला परीक्षेपासून वंचित राहावे लागेल, असा इशारा दिला होता आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थितीची झाडाझडती शिक्षण विभागाने घेण्यास सुरुवात केली खरी; परंतु झाडाझडतीदरम्यान अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तासिकांना अनुपस्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिक्षण विभाग नेहमीच विद्यार्थी नसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा देतो; परंतु पुढे एकाही महाविद्यालयावर शिक्षण विभाग कारवाई करण्याची धमक दाखवित नाही. त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयांचे चांगलेच फावत आहे. शिक्षण विभाग केवळ इशारा देतो; परंतु कारवाई करीत नसल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयेसुद्धा निश्चिंत असतात. त्यामुळे आतातरी शिक्षण विभाग कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)
कनिष्ठ महाविद्यालयांमधील तासिकांना विद्यार्थी उपस्थित राहतात की नाही, याचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने पथक नेमले आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तासिकांना उपस्थिती दिसणार नाही, त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल.
प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी,
माध्यमिक विभाग.