अकोल्यात कमी, तर वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 11:05 AM2021-06-14T11:05:50+5:302021-06-14T11:05:55+5:30
Rainfall : अमरावती विभागात आतापर्यंत ९६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
अकोला : विदर्भात मान्सूनचे आगमन झाले आहे. भाग बदलत सर्वच जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत असून, अमरावती विभागात आतापर्यंत ९६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा असून, सर्वांत कमी ४३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर वाशीम, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मान्सून राज्यात १० जूनला दाखल होईल, असा अंदाज याआधी हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता; मात्र ३ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत मान्सूनचे आगमन होईल, असे सांगितले गेले; मात्र वेगवान प्रवास करीत ५ जूनला मान्सून राज्यात दाखल झाला. मान्सूनची वाटचाल वेगाने असल्याने तीन दिवसांत विदर्भातही दाखल झाला; परंतु वऱ्हाडात मान्सूनचा जोर कमी दिसून येत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या असून, दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत १३ दिवसांत ९६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यंदा पाऊस जास्तच
मागील वर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने पावसाचे प्रमाणही कमी होते. १ ते १३ जून दरम्यान ७४.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असून, ९६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हानिहाय झालेला पाऊस
जिल्हा झालेला पाऊस (मिमी)
बुलडाणा ६८.३
अकोला ४३.७
वाशीम १३०.२
अमरावती १०१.०
यवतमाळ १२६.०