पक्षनिष्ठा आणि संपर्काचा अभाव आघाडीच्या मुळावर!
By admin | Published: December 31, 2015 02:41 AM2015-12-31T02:41:55+5:302015-12-31T02:41:55+5:30
मतदारांमध्ये नाराजी, काँग्रेस राहिली अलिप्त.
विवेक चांदूरकर/वाशिम : मतदार सदस्यांमध्ये पक्षनिष्ठेचा अभाव आणि उमेदवाराकडून योग्य संपर्क नसल्याने विधान परिषद निवडणुकीत आघाडीला पराभव पत्करावा लागला. वाशिम जिल्ह्यात कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार भाजप - सेनेपेक्षा जास्त असतानाही युतीच्या उमेदवाराला झालेले मतदान आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हं निर्माण करणारे आहे.
वाशिम जिल्हा परिषद ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ५२ असून, त्यामध्ये काँग्रेस - १७, राष्ट्रवादी - ८, शिवसेना - ८, भाजपा - ६, मनसे - ४, भारिप - ३, अपक्ष - ६, असे संख्याबळ आहे. ५२ पैकी २५ मतदार काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे असून, वाशिम जिल्हय़ातील सर्व नगरपालिकांची सदस्य संख्या ९१ आहे. जिल्ह्यातील चार पैकी दोन मंगरुळपीर आणि रिसोड नगर परिषद काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. कारंजात सर्वात जास्त सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार जास्त असून, या मतदारांनी पक्षाशी निष्ठा ठेवून मतदान केले असते तर सपकाळ यांना सर्वात जास्त मतदान झाले असते; मात्र सेनेचे विजयी उमेदवार गोपीकिसन बाजोरियांचा जनसंपर्क पक्षनिष्ठेपेक्षाही प्रभावी ठरल्याचे दिसत आहे.
सेना-भाजप युतीचे गोपीकिसन बाजोरिया हे अकोल्याचे तर काँग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सपकाळ हे बुलडाणा येथील रहिवासी आहेत. उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वीपासून तर मतदान होईपर्यंत बाजोरिया यांनी वारंवार जिल्ह्यात दौरे करून प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेतल्या. दुसरीकडे सपकाळ यांनी मतदार सदस्यांना बैठकीला बोलाविण्याचे निमंत्रण राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माध्यमातून दिले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांच्या सहायकांमार्फत मतदार सदस्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचा निरोप दिला. या प्रकारामुळे जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक संतप्त झाले. उमेदवाराने स्वत:ने किंवा त्यांच्या स्वीय सहायकाने बैठकीचा निरोप द्यायला हवा होता, त्यांनी संपर्क साधून मतदारांचे म्हणने ऐकून घ्यायला हवे होते, असे मत काही सदस्यांकडून व्यक्त करण्यात आले. याच संधीचा बाजोरिया यांनी फायदा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचा त्यांना फायदा झाला.
जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना डावलले
जिल्ह्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आहेत. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे हे नेते नाराज झाले व त्याचा परिणाम निकालावर झाला.