अकोला जिल्ह्यातील चार हजारावर शिक्षकांचे पाच टप्प्यांमध्ये निष्ठा प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 04:00 PM2020-01-14T16:00:05+5:302020-01-14T16:00:12+5:30
२0 जानेवारीपासून तालुकास्तरावर प्रशिक्षणाला सुरुवात होणार असून, शिक्षकांच्या २७ बॅचेसला प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अकोला : प्राथमिक शिक्षकांना विविध विषयांवर प्रशिक्षण देऊन शालेय गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत निष्ठा (नॅशनल इनिटिव्हिटिव्ह फॉर स्कूल हेड अॅण्ड टिचर्स होलिस्टिक अॅडव्हान्समेंट) राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू आले आहे. जिल्ह्यातील ४ हजार १८८ शिक्षक निष्ठा प्रशिक्षणामध्ये सहभागी होणार आहेत. २0 जानेवारीपासून तालुकास्तरावर प्रशिक्षणाला सुरुवात होणार असून, शिक्षकांच्या २७ बॅचेसला प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीचे शिक्षक, मुख्याध्यापक, डायटमधील अधिव्याख्याता, केंद्रप्रमुखांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने निष्ठा प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्यापन व मूल्यांकन, विद्यार्थी केंद्रित अध्यापनशास्त्र, विद्यार्थी व शाळा सुरक्षितता, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, समावेशित शिक्षण, अध्ययन अध्यापनात माहिती व तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर, आरोग्य या विषयांसोबतच ग्रंथालय, पर्यावरण क्लब, किचन गार्डन, युवा क्लब, शालेय नेतृत्व गुणवैशिष्ट्ये, पर्यावरणविषयक जाणीव जागृती, शाळापूर्व शिक्षण आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा कार्यक्रम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने निश्चित केला असून, जिल्ह्यातील सात तालुके आणि मनपा क्षेत्रांमधील शिक्षकांना निष्ठा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अकोला तालुक्याचे प्रशिक्षण २0 जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत पाच बॅचमध्ये होणार आहे. अकोट व बाळापूर तालुक्याचे २0 जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत ४ बॅचमध्ये, बार्शीटाकळी तालुक्याचे २0 ते ३१ जानेवारी आणि १0 ते १४ फेब्रुवारीदरम्यान, मूर्तिजापूर, तेल्हारा तालुक्याचे २0 जानेवारी ७ फेब्रुवारीपर्यंत, पातूर तालुक्याचे ३ ते १४ फेब्रुवारी आणि मनपा क्षेत्राचे ३ ते १४ फेब्रुवारीपर्यंत प्रशिक्षण होणार आहे.