अकोल्यात ‘लम्पी’ वाढतोय; ४१० जनावरांना लागण; पशुपालकांमध्ये भीती
By रवी दामोदर | Published: September 3, 2022 06:53 PM2022-09-03T18:53:57+5:302022-09-03T18:54:30+5:30
पशुपालकांमध्ये भीती: १६५ गावांमध्ये आढळले रुग्ण
रवी दामोदर
अकोला: जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोग या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. २ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १६५ गावांमध्ये ४१० जनावरांना लागण झाली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत जनजागृतीसह लसीकरण करण्यात येत आहे. तसेच रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल २० गावे नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.
लम्पीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, पशुपालकांची चिंता वाढली आहे. या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, चिलटे यांच्या मार्फत होतो. तसेच या आजाराचा प्रसार निरोगी आणि बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. त्यामुळे पशुपालकांची आणखी डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १६५ गावांमध्ये लम्पीचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्यास्थितीत ४१० पशु रुग्ण उपचाराधीन असून, बाधित गावांतील २२ हजार ८७१ पशुधन धोक्यात आले आहे. दुसरीकडे, पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव हा अकोट व तेल्हरा तालुक्यात वाढलेला दिसून येत आहे.
जिल्ह्यातील २० गावे नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित
लम्पीचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे संसर्ग केंद्रापासून १० किलोमीटर बाधीत क्षेत्र नियंत्रित क्षेत्र घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून, जिल्ह्यातील २० गावे नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. त्यामध्ये अकोला तालुक्यातील पैलपाडा, अकोट तालुक्यातील उमरा, बेलूरा, मकरमपूर, जितापूर, लाडेगाव, रामापूर, शहापूर, रूपागड, जळगाव नहाटे, सुकळी, अकोट व मुर्तिजापूर तालुक्यातील सिरसो, शेरवाडी तसेच बार्शिटाकळी तालुक्यातील धाबा, लोहगड (तांडा), बाळापूर येथील व्याळा, कोळसा, पातूर तालुक्यातील बोडखा, आगीखेड या गावांचा समावेश आहे.
म्हैसींमध्ये प्रसार होण्याचे प्रमाण नगन्य
लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असला तरी म्हैसवर्गीय पशुंमध्ये लम्पी आढळून येत नसल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४१० गुरांना लम्पीची लागण झाली आहे, मात्र त्यामध्ये केवळ एकाच म्हैसवर्गीय पशुला लागण झाली आहे. इतर सर्व रुग्ण हे गायवर्गीय पशुच असल्याचे दिसून येत आहे.