अकोल्यात लम्पी वाढतोय; आणखी 4 गुरांना लागण, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
By रवी दामोदर | Published: September 5, 2023 05:14 PM2023-09-05T17:14:58+5:302023-09-05T17:15:38+5:30
मूर्तिजापूर शहरातील पठाणपुरा भागात सुरुवातीला एका गायीला लम्पी झाल्याचे आढळून आले.
अकोला : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यात लम्पी आजारानेही हातपाय पसरविणे सुरू केले असून, मंगळवारी आणखी चार गुरांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. लम्पी त्वचारोगाची लागण झाल्याचे आढळले असून, त्या सर्व ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागास पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाल्यानुसार प्रतिबंधात्मक आदेश प्र. जिल्हा दंडाधिकारी वैष्णवी बी. यांनी मंगळवारी जारी केले.
मूर्तिजापूर शहरातील पठाणपुरा भागात सुरुवातीला एका गायीला लम्पी झाल्याचे आढळून आले. त्यानंतर लम्पीने वेग धरला असून, सध्यास्थितीत ५ गुरे लम्पी बाधित आहेत. त्यामध्ये पातूर तालुक्यातील आलेगावातील एका गाईमध्ये, आसोला गावातील एका बैलामध्ये, बार्शिटाकळी तालुक्यातील येवता या गावातील नर वासरामध्ये व मूर्तिजापूर तालुक्यातील मंदुरा गावातील एका बैलामध्ये लंपी त्वचारोगाची लागण आढळून आली. या चारही गावांतील संसर्ग केंद्रापासून १० किमी क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पाच किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जि. प. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तसेच जिल्हा पशूवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांनी नियोजन करून लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
गुरांना लम्पी सदृश्य आजाराचे लक्षणे दिसून आल्यास त्वरित पशु वैद्यकीय रुग्णालयात दाखल करावे. तसेच लम्पीला रोखण्यासाठी लसीकरण पूर्ण करावे. लम्पी संदर्भात त्वरित पशुसंवर्धन विभागाला माहिती देऊन सहकार्य करावे. पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- डॉ. जगदीश बुकतरे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग अकोला.