लक्झरीने दुचाकीला उडविले; एक ठार, दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:56 PM2020-08-22T17:56:59+5:302020-08-22T17:57:38+5:30
मृताची पत्नी व ३ वर्षांचा मुलगा हे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, २२ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
बाळापूर: राष्ट्रीय महामार्गावरील पारस फाट्यानजीक लक्झरी बसने दुचाकीला उडविल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, मृताची पत्नी व ३ वर्षांचा मुलगा हे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, २२ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
खामगावहून अकोल्यााकडे जाणाऱ्या लक्झरी बस क्रमांक जी.जे.०५ ए.झेड. ८९१२ बसने बाळापूरहून पारसकडे जाणारी दुचाकी क्रमांक एम. एच. ३० बी.के. १४७६ ला उडविल्याने या भीषण अपघातात दुचाकीस्वार सुधाकर दाभाडे (४५) रा. तुलंगा, ता. पातूर जागीच ठार झाले, तर पत्नी अनिता दाभाडे (४०), मुलगा संघर्ष (३) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून, जखमी अनिता दाभाडे यांची स्थिती नाजूक असल्याची माहिती आहे.
अपघात एवढा भीषण होता की, लक्झरी बसने उडविल्यानंतर दुचाकी फेकल्या गेली. यामध्ये दुचाकीस्वार सुधाकर दाभाडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.
(फोटो आहे)