लक्झरी बस उलटली, युवती ठार
By Admin | Published: May 18, 2017 01:09 AM2017-05-18T01:09:17+5:302017-05-18T01:09:17+5:30
आकोट : खासगी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी बस अचानक उलटून झालेल्या अपघातात एक युवती ठार झाली असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
अकोट - अंजनगाव मार्गावरील घटना: अनेक प्रवासी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोट : खासगी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी बस अचानक उलटून झालेल्या अपघातात एक युवती ठार झाली असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. रस्त्यावरील वाहनधारकांनी वाहने थांबवून लक्झरीमधील जखमींना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. हा अपघात अकोट - अंजनगाव मार्गावरील वाई फाट्यानजिक १७ मे रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडला.
खासगी प्रवासी वाहतूक करणारी एम पी ४८ पी 0१६२ या क्रमांकाची लक्झरी बस अकोटवरुन अंजनगावकडे जात होती. त्यावेळी वाई फाट्यानजीक रस्त्याच्या कडेला अचानक लक्झरी उलटली. या अपघातात रुकैया परविन इस्त्राईलशा (१९) रा.अंजनगाव या युवतीचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला, तर फइम खान जब्बार खान रा.परतवाडा, गजानन रामकृष्ण गोमासे रा.लखाड, आयशाबी बरकतखा हे गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे. काही जखमींना घटनास्थळावरून परस्पर इतरत्र खासगी दवाखान्यात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी.जे.अब्दागिरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. अपघात नेमका कशामुळे घडला, याची माहिती मिळू शकली नाही.
अपघात झाल्यानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तर दोन्हीकडून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. के्रेनच्या साह्याने लक्झरी बस हटविण्यात आली. हा अपघात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी लक्झरीचालकास चौकशीकरिता ताब्यात घेतले असून, उशिरा रात्रीपर्यंत यासंदर्भात कार्यवाही सुरू होती.