मा जिजाऊंच्या लेकीची सुवर्ण भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2016 02:39 AM2016-09-24T02:39:13+5:302016-09-24T02:39:13+5:30
आयएसएसएफ ज्युनियर विश्चषक नेमबाजी स्पर्धेत हर्षदाला सुवर्णपदक.
अशरफ पटेल
देऊळगावराजा (जि. बुलडाणा), दि. २३ - तालुक्यातील देऊळगावमही येथील गरीब कुटुंबातील हर्षदाने आयएसएसएफ ज्युनियर विश्चषक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळून दिले. आंतरराष्ट्रीय शुटिंग स्पोर्ट फेडरेशनद्वारे अजरबैजान येथे पार पडलेल्या स्पर्धेत हर्षदा निठवेने महिलांच्या १0 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारात यशस्विनी देवसाल आणि मलायका गोएलसोबत सुवर्णपदकाची कमाई केली.
देउळगावमही येथील रहिवासी असलेले सदानंद अप्पा निठवे खानावळीचा व्यवसाय करतात. त्यांना मिळणार्या अल्पशा मिळकतीतून संसाराचा गाढा ओढत असताना त्यांनी हर्षदाला क्रीडा क्षेत्रात भरारी घेण्यास प्रोत्साहित केले. हर्षदा निठवे हिने जिद्दीच्या बळावर आजपर्यंत अनेक शुटिंग पिस्तूल स्पर्धांमध्ये ५५ पदके प्राप्त केली आहेत.
१९ सप्टेंबर रोजी अझरबैजानमधील गाबेल येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हर्षदाने सांघिक गटाच्या अंतिम फेरीत ११२२ गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकाचा बहुमान प्राप्त केला. या स्पर्धेत हर्षदा महाराष्ट्र युवा संघाचा नेतृत्व करीत आहे. तसेच संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथील एमजीएममध्ये अद्ययावत शुटिंग रेंजचा सराव करीत आहे. तसेच एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांनी हर्षदा यांच्या सरावासाठी नि:शुल्क व्यवस्था करून दिली. नवी दिल्ली येथे झालेल्या आठव्या आशिया स्पर्धेमध्ये शुटिंग स्पर्धेत भारताला कांस्यपदक आणि सांघिक गटात सुवर्णपदक मिळवून दिले होते.