आयुक्त मॅडम, हक्काच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम धाराशायी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:40+5:302021-05-22T04:17:40+5:30
अकोला: शेतीची व भूखंडाची वारसदार असलेल्या वृद्ध आईला डावलून खुद्द मामाने भूखंडावर अनधिकृत ताबा करून त्यावर बांधकाम केल्याचा धक्कादायक ...
अकोला: शेतीची व भूखंडाची वारसदार असलेल्या वृद्ध आईला डावलून खुद्द मामाने भूखंडावर अनधिकृत ताबा करून त्यावर बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी वृद्ध महिलेच्या मुलाने मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्याकडे धाव घेऊन हक्काच्या जागेवर उभारलेले अनधिकृत बांधकाम धाराशायी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी मनपा आयुक्त निमा अरोरा कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजरोजी यवतमाळ येथे राहत असलेले राजेंद्र गोपाल बेहरे यांच्या आईचा शहरातील कौलखेड परिसरात शेत सर्वे नंबर ६ व ७ मध्ये भूखंड आहे. तसेच त्यांच्या आईच्या नावे चांदूर परिसर व तेल्हारा तालुक्यातील ममदाबाद या परिसरात मालकीची शेती आहे. या शेतीमध्ये व भूखंडामध्ये वडिलोपार्जित वारसदार असलेल्या राजेंद्र बेहरे यांच्या आईला डावलून त्यांच्या मामाने या जमिनीवर अवैधरित्या ताबा केल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कौलखेड परिसरातील भूखंड राजेंद्र बेहरे यांच्या आईला वारसदार म्हणून मिळाला होता. या भूखंडावर बेहेरे यांच्या बलोदे नामक मामाने अनधिकृत ताबा घेऊन त्यावर बांधकाम केल्याची तक्रार राजेंद्र बेहरे यांनी मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्याकडे केली आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने त्यावर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त अरोरा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु आयुक्तांच्या आदेशानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे याप्रकरणी आयुक्त निमा अरोरा यांनी जातीने लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी तक्रारकर्ते राजेंद्र बेहरे यांनी केली आहे.