मध्य प्रदेशातील युवतीस ठेवले सुधारगृहात
By Admin | Published: January 10, 2017 02:24 AM2017-01-10T02:24:28+5:302017-01-10T02:24:28+5:30
संभाजी ब्रिगेडने दिली युवतीस मदत.
अकोला, दि. ९- अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन खांब परिसरात एका युवतीला घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या युवकासह मध्य प्रदेशातील युवतीस संभाजी ब्रिगेडच्या मदतीने अकोट फैल पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र २४ तासांच्या वर कालावधी उलटला असतानाही पोलिसांनी सदर युवकावर कारवाई केलेली नाही. या प्रकरणातील युवतीला आई-वडील नसल्याचे समोर आल्यानंतर तिला सुधारगृहात ठेवण्यात आले असून संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष पवन महल्ले यांनी तिला आवश्यक ती मदत केली.
अकोट येथील रहिवासी असलेला अशफाक नामक युवक आणि मध्य प्रदेशातील युवती नांदुरा येथे सोबतच कामाला होते. रविवारी सायंकाळी ही युवती मध्य प्रदेशात परत जाण्यासाठी निघाली; मात्र तिची पर्स हरवल्याने तिने सदर युवकाला फोन करून पैशाची मदत मागितली. मध्य प्रदेशात परत जाण्यासाठी सदर युवकाने तिला पैसे देण्याचे कबूल केले; मात्र अकोट फैलातील तीन खांब परिसरात एक मित्र पैसे देणार असल्याचे त्याने तिला सांगितले. अकोल्याची काहीही माहिती नसलेली युवती युवकावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत जात होती; मात्र सदर युवती संभाजी ब्रिगेडचे पवन महल्ले व कार्यकर्त्यांना दिसल्यानंतर त्यांनी विचारपूस केली. युवतीने सदर माहिती त्यांना सांगितली; मात्र युवक तिला ज्या परिसरात नेत होता तो परिसर जंगल आणि मद्यधुंद युवकांचा अड्डा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महल्ले यांनी पोलिसांना माहिती दिली. अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळ गाठून युवकाला ताब्यात घेतले, तसेच युवतीला सुधारगृहात पाठविले.
तिच्या कुटुंबीयांची माहिती घेतली असता तिला आई-वडील नसल्याचे समोर आले. पवन महल्ले व अन्य कार्यकर्त्यांंनी ही समयसूचकता दाखविली नसती तर युवतीच्या आयुष्याची राखरांगोळी झाली असती; मात्र एवढे असतानाही पोलिसांनी सदर युवकावर सोमवारी रात्रीपर्यंत ठोस कारवाई केली नव्हती.