अळसपुरेंच्या बदलीसाठी माफिया एकवटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:52 AM2017-10-13T01:52:12+5:302017-10-13T01:55:04+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे त्यांच्या बदलीची फिल्डिंग लावण्यात आली आहे.

Mafia action for aalaspure's transfer! | अळसपुरेंच्या बदलीसाठी माफिया एकवटले!

अळसपुरेंच्या बदलीसाठी माफिया एकवटले!

Next
ठळक मुद्देअमरावती येथून फिल्डिंगसहा महिन्यात बदलीचे प्रयत्न

सचिन राऊत । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे त्यांच्या बदलीची फिल्डिंग लावण्यात आली आहे. अमरावती व अकोल्यातील गुटखा माफिया, सट्टा माफिया यांनी एकत्र येत अळसपुरे यांची कुठल्याही परिस्थितीत बदली करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. यामध्ये पोलीस खात्यातील काही अधिकारीही बदलीसाठी देव पाण्यात बुडवून बसले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्यासह पोलीस खात्याची मान उंचावणार्‍या कारवाया विशेष पथकाने केलेल्या आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्हय़ांत एवढय़ा कारवाया पोलिसांच्या इतिहासात झालेल्या नसताना हर्षराज अळसपुरे यांनी सात महिन्यांच्या कालावधीत उत्तुंग कारवाया करीत तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर ४७२ वर आरोपींना अटक केली आहे. यामध्ये हुक्का पार्लर, पुस्तक विक्रेत्यांवरील कारवाई, तब्बल १00 वर जनावरांना जीवनदान, गुटखा माफियाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळय़ात अडकवून अकोला पोलिसांच्या प्रामाणिकतेचा राज्य स्तरावर झेंडा रोवण्याचे काम अळसपुरे यांच्या कारकिर्दीत झाले. याच कारवाया गुटखा माफिया, सट्टा माफिया व हप्तेखोर पोलिसांच्या जिव्हारी लागल्याने, या अभद्र युतीने हर्षराज अळसपुरे यांच्या बदलीची फिल्डिंग लावली. 
एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नसताना अळसपुरे यांना हटविण्यासाठी सर्व ताकद लावण्यात आली आहे. मात्र, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर व गृहखाते अळसपुरेंच्या पाठीशी असल्याने त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न करणार्‍यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जात आहे. 
एकूणच कारवाईचा सपाटा थांबणार नसल्याचे लक्षात येताच, एका इमानदार अधिकार्‍याला टार्गेट करून फसविण्याचा घाटही घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस अधीक्षक ठामपणे पाठीशी असल्याने अद्याप तरी अळसपुरेंच्या बदलीला ब्रेक लागला आहे. 

राज्यात आठ बडे गुटखा माफिया
राज्यात आठ बडे गुटखा माफिया असून, यामध्ये अमरावती येथील गुटखा किंगचा समावेश आहे. या आठ बड्या गुटखा माफियांचा ‘बॉस’ बनण्याचा प्रयत्न ठाणे क्राइम ब्रांचने अटक केलेल्या इक्बाल कासकरने केला होता, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या बयानात समोर आली. मात्र, या कासकर याला अटक करण्यात आल्योन त्याचे प्रयत्न असफल ठरले. यामधीलच काही गुटखा माफिया अळसपुरेंची बदली करण्यासाठी मुंबईतही ठाण मांडून बसले आहेत.

गृह राज्यमंत्र्यांकडेही हालचाली
काही माफियांनी अळसपुरे यांच्या बदलीसाठी गृह राज्यमंत्र्यांकडे हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, या ठिकाणावरून साफ नकार आल्याने अळसपुरे यांच्या बदलीसाठी फिल्डिंग लावणारे नाऊमेद झाले आहेत. अळसपुरेंसारखा खमक्या अधिकारी अकोल्यात आवश्यक असल्याचे, या माफियांना सांगण्यात आल्याने माफियांनी अमरावती येथून फिल्डिंग लावण्यात आल्याची माहिती आहे.

तासाप्रमाणे लाखोंचे नुकसान
गुटखा माफियांनी अकोल्यात गुटख्याचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अकोल्यात गुटखा विक्री बंदच्या परिस्थितीत असून, त्यामुळे गुटखा माफियांच्या साखळीचे तासाप्रमाणे लाखो रुपयांनी नुकसान होत आहे. याच प्रकारामुळे अळसपुरेंची बदली करण्यासाठी चारही बाजूने प्रयत्न करण्यात येत आहे. गुटख्याचा पुरवठा होत नसल्याने ५0 ते ७0 पैशांची एक पुडी सात रुपयांनाही विकली जात आहे.

Web Title: Mafia action for aalaspure's transfer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.