आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी ‘माफसू’चे शेतकरी जनजागृती अभियान!
By admin | Published: August 18, 2015 01:33 AM2015-08-18T01:33:07+5:302015-08-18T01:33:07+5:30
विदर्भ-मराठवाड्यातील एक हजार गावांत शास्त्रज्ञ करणार प्रबोधन.
अकोला : शेतकर्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने (माफसू) विदर्भ -मराठवाड्यातील एक हजार गावांत शेतकरी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतीला पुरक दुग्ध, कुक्कुट व पशुसंवर्धनाचा व्यवसाय करण्यासाठी माफ सूचे शास्त्रज्ञ शेतकर्यांचे प्रबोधन करणार आहेत. ग्रामीण भागात पूर्वी प्रत्येक शेतकर्याकडे पशुधन असायचे, किमान दोन गायी, म्हैस असायचीच; पण अलीकडे नगदी पिकांकडे (कॅश क्रॉप) शेतकरी वळल्याने गावागावांतील पशुधन कमी झाले आहे. या नगदी पिकांमुळे शेतातील चार्याचे उत्पादनच घटले आहे. परिणामी शेतकर्यांनी पशुधन कमी केले आहे; पण बदलत्या परिस्थितीत आता शेतीला पुरक उद्योगांची गरज निर्माण झाली असून, शेतकर्यांना आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिकेपासून परावृत्त करण्यासाठी ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय व इतर कृषीवर आधारित पुरक व्यवसाय सुरू करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने माफूसच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने विदर्भ-मराठवाड्यातील शेतकर्यांचे प्रबोधन करण्यासाठी शेतकरी जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिकेपासून शेतकर्यांना परावृत्त करण्याची गरज आहे. त्यासाठी विदर्भ- मराठवाड्यातील शेतकर्यांनी शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी शेतकरी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा खर्च स्वत: पशू शास्त्रज्ञ करणार असल्याचे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. एन.एन. झाडे यांनी सांगीतले.