महाबीज निवडणूक : मतपत्रिका असलेल्या स्ट्राँग रूमचे सील तुटले; छाननी थांबली!
By राजेश शेगोकार | Published: September 17, 2022 03:08 PM2022-09-17T15:08:55+5:302022-09-17T15:12:35+5:30
महाबीज'च्या दोन संचालक पदाच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालक पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, शनिवार, १७ सप्टेंबर रोजी मतपत्रिका असलेल्या स्ट्रॉंग रूमच्या एका दरवाज्याचे सील तुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उमेदवारांच्या प्रतिनिधींनी छाननी प्रक्रिया थांबविली व याप्रकरणी चौकशी करून पोलीस तक्रार देण्याची मागणी केली.
'महाबीज'च्या दोन संचालक पदाच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशा दोन मतदारसंघाचे गठन केले आहे. या निवडणुकीत विदर्भ मतदार संघातून डॉ. रणजीत सपकाळ, प्रशांत गावंडे तर उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव देशमुख, ॲड. विष्णुपंत सोळंके यांच्यात लढत होत आहे. १४ सप्टेंबर पर्यंत मतपत्रिका स्वीकारण्यात आल्या. त्यानंतर १५ सप्टेंबरपासून मतपत्रिका छाननी व वैद्य मतपत्रिकांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. २१ सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. परंतु, १७ सप्टेंबर रोजी मतपत्रिका ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमच्या एका दरवाजाचे सील तुटल्याचे निदर्शनास आले.
मात्र, दुसऱ्या आणि महत्त्वाच्या दरवाजाचे सील कायम असल्याने सर्व मतपत्रिका सुस्थितीत होत्या. पण, उमेदवारांच्या प्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत मतपत्रिकांची छाननी प्रक्रिया थांबविली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. याप्रकरणी महाबीज प्रशासनाने पोलीस विभागाला कळविले असून, पुढील चौकशी सुरू आहे. दुपार नंतर पुन्हा छाननी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.