अध्यक्षांच्या गैरहजेरीवर ‘महाबीज’च्या सभेत गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 02:02 AM2017-10-05T02:02:11+5:302017-10-05T02:02:22+5:30

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) सर्वसाधारण सभेला अध्यक्ष तथा कृषी खात्याचे सचिव गैरहजर राहिल्याच्या मुद्यावर  संचालकांसह भागधारक शेतकर्‍यांनी आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केल्याने बुधवारी ‘महाबीज’च्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ झाला. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली.

'Mahabeej' meeting at the absence of President! | अध्यक्षांच्या गैरहजेरीवर ‘महाबीज’च्या सभेत गोंधळ!

अध्यक्षांच्या गैरहजेरीवर ‘महाबीज’च्या सभेत गोंधळ!

Next
ठळक मुद्देसंचालकांसह भागधारक शेतकर्‍यांची तीव्र नाराजी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) सर्वसाधारण सभेला अध्यक्ष तथा कृषी खात्याचे सचिव गैरहजर राहिल्याच्या मुद्यावर  संचालकांसह भागधारक शेतकर्‍यांनी आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केल्याने बुधवारी ‘महाबीज’च्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ झाला. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली.
‘महाबीज’ची सर्वसाधारण सभा ४ ऑक्टोबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात ‘महाबीज’चे अध्यक्ष तथा कृषी खात्याचे सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात होती; परंतु सभेला अध्यक्ष तथा कृषी सचिव अनुपस्थित होते. अध्यक्षांच्या अनुपस्थितीच्या मुद्यावर महाबीजच्या संचालकांसह भागधारक शेतकर्‍यांनी आक्षेप घेत तीव्र रोष व्यक्त केला. 
त्यामुळे या मुद्यावरून महाबीजच्या सर्वसाधारण सभेत काही वेळ गोंधळ झाला. यासंदर्भात महाबीजचे संचालक खासदार संजय धोत्रे यांनी अध्यक्ष तथा कृषी सचिव विजय कुमार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून चर्चा केली असता, मुंबई येथे महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक असल्याने, महाबीजच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहता आले नाही, अशी माहिती कृषी सचिवांनी दिली. तसेच सभेला अनुपस्थित राहिल्याबद्दल कृषी सचिवांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कृषी सचिवांचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे कृषी आयुक्त एस.पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेला महाबीजचे संचालक खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, वल्लभराव देशमुख, तज्ज्ञ संचालक अनिता चोरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांच्यासह महाबीजचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या सभेत संचालकांसह भागधारक शेतकर्‍यांनी मांडलेल्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

सोयाबीन नुकसान भरपाई अनुदान वाटपातील भ्रष्टाचार गाजला! 

दोन वर्षांपूर्वी महाबीजमार्फत वितरित सोयाबीन बियाण्यापैकी काही ठिकाणी बियाणे उगवले नाही. त्यामुळे संबंधित शेतकर्‍यांना सोयाबीन नुकसान भरपाईपोटी अनुदान वाटप करण्यात आले; मात्र या अनुदान वाटपातील भ्रष्टाचाराचा मुद्दा महाबीजच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. आमदार रणधीर सावरकर यांच्यासह संचालक आणि भागधारक शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेत हा मुद्दा मांडला. यासंदर्भात महिनाभरात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश अग्रवाल यांनी सभेत दिले. आपल्यातील दोष किंवा चुकांकडे महाबीजने लक्ष ठेवून आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि कारवाई तातडीने केली पाहिजे, अशी सूचना खा. संजय धोत्रे यांनी यावेळी केली.

१८ नोव्हेंबरला अकोल्यात शेतकर्‍यांशी 
संवाद साधणार; कृषी सचिवांची ग्वाही!
महाबीजच्या सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत, १८ नोव्हेंबर रोजी अकोल्यात येणार असून, महाबीजचे संचालक आणि भागधारक शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहे, अशी ग्वाही महाबीजचे अध्यक्ष तथा कृषी सचिव विजय कुमार यांनी महाबीजच्या संचालकांसह भागधारक शेतकर्‍यांना भ्रमणध्वनीद्वारे बोलताना दिली.

बीजोत्पादक शेतकर्‍यांना अतिरिक्त रक्कम देणार! 
बीजोत्पादक शेतकर्‍यांना बियाण्याची अतिरिक्त रक्कम देण्याचे महाबीजच्या सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले. त्यामध्ये तूर उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ८00 रुपये, हरभरा बीजोत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ४५0 रुपये, कांदा बीजोत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल नऊ हजार रुपये अतिरिक्त रक्कम देण्याचे ठरविण्यात आले.

‘महाबीज’च्या सर्वसाधारण सभेला अध्यक्ष तथा कृषी सचिव अनुपस्थित होते. या मुद्यावर सभेत सर्वांनी तीव्र रोष व्यक्त केला; परंतु कृषी सचिव मुंबई येथे आयोजित महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने, ते या महाबीजच्या सभेला उपस्थित राहू शकले नाही. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महाबीजची सभा पार पडली.
- खा. संजय धोत्रे,
संचालक, महाबीज.

Web Title: 'Mahabeej' meeting at the absence of President!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.