महानिर्मितीच्या राज्यस्तरीय आंतरगृह क्रीडा स्पर्धेस पारस येथे प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 04:28 PM2017-12-26T16:28:40+5:302017-12-26T16:31:35+5:30
पारस (अकोला) : महानिर्मितीच्या आंतरगृह तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी विकास जयदेव यांचे हस्ते झाले.
पारस (अकोला) : वीज उत्पादनाच्या खडतर कामात अधिकारी-कर्मचारी वैयक्तिक लक्ष घालून कार्यक्षमता वाढवितात, त्याचप्रमाणे प्रत्येक खेळाडूने आपले क्रीडा कौशल्य पणाला लावून सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करावे, कारण खेळल्याने शरीरस्वास्थ्य अधिक चांगले राहते असे मत महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प)विकास जयदेव यांनी व्यक्त केले. महानिर्मितीच्या आंतरगृह क्रीडास्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते विद्युत नगर क्रीडांगण पारस येथे बोलत होते.
तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी विकास जयदेव यांचे हस्ते झाले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर, मुख्य अभियंते प्रमोद नाफडे,अनंत देवतारे, प्रकाश खंडारे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे, उप मुख्य अभियंता मनोहर मसराम प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
महानिर्मितीच्या नामांकित राष्ट्रीय खेळाडूंनी क्रीडाज्योत आणली.त्यात रवींद्र चौधरी, संजय श्रीवास्तव, शरद पांडे, अविनाश राठोड, बी.डी.जायभाये, एल.आर.सतीन्जे आदींचा समावेश होता. याप्रसंगी कैलाश चिरुटकर म्हणाले की, पारस वीज केंद्राने वीज उत्पादनात आपला नावलौकिक मिळविला आहे, अशा स्पर्धेच्या माध्यमातून नवचैतन्य व उत्साह निर्माण होत असल्याने आगामी काळात पारस वीज केंद्र अधिक चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पारस वीज केंद्राचे मुख्य अभियंता व क्रीडा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रकाश खंडारे म्हणाले कि, खेळामध्ये सहभाग महत्वाचा आहे त्यामुळे सांघिक भावना वाढीस लागते. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूना शुभेच्छा दिल्या.
दीपचंद चावरिया, अनिता गायकवाड व चमूच्या सुमधुर स्वागतगीतानंतर सरस्वती विद्यालयाच्या मुला-मुलींच्या नेत्रदीपक कवायतींनी उपस्थितांची वाहवा मिळवली. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक अनिल मुसळे, संचालन राम गलगलीकर व आदिती धाराशिवकर यांनी तर आभार प्रदर्शन संदीप पळसपगार यांनी केले.
या प्रसंगी अधीक्षक अभियंते कन्हैयालाल माटे, रुपेंद्र् गोरे, सुधाकर पाटील, श्रीराम बोदे, उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भालचंद्र गायकवाड, कल्याण अधिकारी विलास हिरे, पंकज सनेर, प्रसाद निकम, आनंद वाघमारे, दिलीप वंजारी, अमरजित गोडबोले, कोपटे, विविध वीज केंद्रांचे संघ व्यवस्थापक ,खेळाडू, पारस वीज केंद्राचे अधिकारी,विभाग प्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ,संघटना प्रतिनिधी, वसाहतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.