महाजनादेश यात्रेतून मांडणार सरकारचा लेखाजोखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 01:55 PM2019-08-05T13:55:22+5:302019-08-05T13:55:31+5:30
अकोला : गत पाच वर्षांत राज्यात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली असून, मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा अकोल्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गत पाच वर्षांत राज्यात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली असून, मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा अकोल्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. ६ आॅगस्ट रोजी महाजनादेश यात्रा अकोल्यात पोहोचणार असून, सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. अकोल्यातील मुक्कामानंतर बुधवारी सकाळी ११ वाजता बाळापूर येथे मुख्यमंत्र्यांसह महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात येणार असल्याचे डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. राज्याला कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी जनादेश मागण्याकरिता मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येत आहे, असेही डॉ. रणजित पाटील यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड व माजी आमदार नारायणराव गव्हाणकर उपस्थित होते.
अकोला पोलीस आयुक्तालय निर्मितीला प्राधान्य!
पिंप्री चिंचवड, मीरा भार्इंदर येथे पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली असून, आता अकोला आणि कोल्हापूर येथे पोलीस आयुक्तालय निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. गत पाच वर्षांत जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.